(देवरूख / प्रतिनिधी)
संगमेश्वर – साखरपा राज्यमार्गावरील साडवली सह्याद्रीनगर भागातील मोठ्या प्रमाणातील खड्ड्यांमुळे नागरिक व वाहनचालक हैराण झाले होते. खड्ड्यांमुळे विशेषतः दुचाकीस्वारांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत होती. अनेक अपघात या खड्ड्यांमुळे घडल्याचे स्थानिकांनी निदर्शनास आणून दिले होते.
या गंभीर समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) सातत्याने दुर्लक्ष करत असल्याने सह्याद्रीनगर युवासेना आक्रमक झाली. युवासेनेचे पदाधिकारी सिद्धेश सुर्वे, सौरभ मांगले, सूरज रेडीज, आदेश इंदुलकर आणि ग्रामपंचायत सदस्य विनोद वाडकर यांनी थेट देवरूख सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयात जाऊन उपविभागीय अभियंता वैभव जाधव यांना खड्ड्यांच्या समस्येसंदर्भात जाब विचारत दणका दिला. युवासेनेच्या या ठाम भूमिकेमुळे संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत खड्डे भरण्याचे काम सुरू केले. त्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यासंदर्भात बोलताना सिद्धेश सुर्वे यांनी, “उपविभागीय अभियंता वैभव जाधव आणि त्यांच्या टीमने तातडीने काम हाती घेतल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. मात्र, यापुढे अशा तक्रारींची वाट न बघता सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांवर स्वखुशीने लक्ष द्यावे,” अशी स्पष्ट मागणी केली.
या भागातील रस्त्यावरील खड्डे भरून काढल्याने सध्या तरी नागरिक आणि वाहनधारकांना थोडा दिलासा मिळाला आहे.