(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील गजबजलेल्या आठवडा बाजार परिसरात ग्राहकांवरून झालेल्या व्यवसायिक वादाने हिंसक वळण घेत कपडा व्यापाऱ्यावर लोखंडी सळीने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात अनिल विसंबर यादव (वय ३०, मूळ रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. कोकणनगर, रत्नागिरी) हे गंभीर जखमी झाले असून, शहरात व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी अनिल यादव यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी पप्पू आणि सुरेश (पूर्ण नाव माहीत नाही, दोघे रा. साळवी स्टॉप, चिराय हॉस्पिटलजवळ, रत्नागिरी) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १६ मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास आठवडा बाजार परिसरात ही घटना घडली.
अनिल यादव हे कपड्यांचा व्यवसाय करत असून रात्री दुकान बंद करण्याची तयारी सुरू होती. त्याचवेळी समोरील दुकानातील आरोपींना “आमचे कपडे घेणारे ग्राहक का तोडता?” असा प्रश्न त्यांनी विचारला. या साध्या प्रश्नावरून वातावरण तापले आणि संतप्त झालेल्या आरोपींनी दुकानातील लोखंडी सळ्या हातात घेत अनिल यादव यांच्या डोक्यावर वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात यादव गंभीर जखमी झाले. तसेच आरोपींनी त्यांना अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या साक्षीदारालाही आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत दमदाटी केल्याचे समोर आले आहे. घटनेनंतर जखमी अनिल यादव यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांनी १७ मे रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार रत्नागिरी शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

