(रत्नागिरी / प्रतिनिधी)
भगवतीनगर समुद्रकिनाऱ्यावर कालवं काढण्यासाठी गेलेल्या महिलेचा मोठ्या लाटेच्या तडाख्यात समुद्रात वाहून जाण्याचा थरारक प्रकार घडला. मात्र, प्रसंगावधान आणि अफाट धाडस दाखवत मिलके कुटुंबाने केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे या महिलेला अक्षरशः जीवदान मिळाले. या धाडसी बचावकार्यामुळे परिसरातून मिलके कुटुंबावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सबीला भाटकर (वय ३५, रा. भाटकरवाडा) असे बचाव करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सबीला या भगवतीनगर किनाऱ्यावर कालवं काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी अचानक आलेल्या प्रचंड लाटेच्या धक्क्याने त्या समुद्रात कोसळल्या. पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे त्या क्षणार्धात खोल समुद्राकडे वाहून जाऊ लागल्या. परिस्थिती गंभीर होताच त्यांनी मदतीसाठी आर्त हाक मारण्यास सुरुवात केली. याचवेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या मिलके सर आणि गौरी मिलके यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखत क्षणाचाही विलंब न लावता मदतीसाठी धाव घेतली. तरुण करण मिलके याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता थेट उधाणलेल्या समुद्रात झेप घेतली.
समुद्रातील वेगवान प्रवाहाशी झुंज देत करणने सबीला भाटकर यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना सुखरूप बाहेर आणले. या थरारक बचावकार्यानंतर उपस्थितांनी सुटकेचा निश्वास टाकला. बचावलेल्या सबीला भाटकर यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संकटाच्या क्षणी मिलके सरांचे अचूक मार्गदर्शन, गौरी मिलके यांची तत्परता आणि करण मिलके याने दाखवलेले धैर्य, मानवता व जीवाची पर्वा न करता केलेले साहसी कृत्य यामुळे या घटनेत एका महिलेचे प्राण वाचले आहे. या धाडसी कृतीचे आता सर्वत्र कौतुक होत आहे.

