( रत्नागिरी )
भारतीय जनता पक्ष दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी चार तालुक्यांतील मंडलांच्या दौऱ्याला प्रारंभ केला आहे. या दौऱ्याअंतर्गत त्यांनी संगमेश्वर उत्तर व दक्षिण, लांजा उत्तर व दक्षिण तसेच राजापूर पूर्व आणि पश्चिम मंडलांना भेट देत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पक्ष संघटना अधिक सक्षम आणि बळकट करण्यासाठी हा दौरा निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी व्यक्त केला.
या भेटीदरम्यान प्रत्येक मंडल अध्यक्षांकडून संघटनात्मक कामकाजाचा तसेच प्रदेशस्तरावरून राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पक्षाची भूमिका समजावून सांगत मार्गदर्शन केले.
या दौऱ्यात त्यांच्यासमवेत जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, अभिजीत गुरव, शीतल पटेल, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष लियाकत शहा तसेच मंडल अध्यक्ष विनोद म्हस्के, रूपेश कदम, विराज हरमले, शैलेश खामकर, मोहन घुमे आणि एकनाथ मोंडे उपस्थित होते.

