( तेहरान )
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढताना दिसत असून, इराणने अमेरिकेला थेट युद्धाचा इशारा दिला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे (IRGC) माजी कमांडर आणि एक्सपीडियन्सी कौन्सिलचे सदस्य मोहसेन रेजाई यांनी अमेरिकेला इराणी बंदरांवरील नौदल घेराबंदी तात्काळ हटवण्याचा इशारा दिला आहे. अन्यथा “ओमान समुद्र अमेरिकेसाठी स्मशानभूमी ठरेल,” असा गंभीर इशाराही त्यांनी दिला.
इराणच्या सरकारी दूरदर्शन वाहिनीवर बोलताना मोहसेन रेजाई म्हणाले की, अमेरिकेने इराणी बंदरांभोवती निर्माण केलेली नौदल घेराबंदी ही प्रत्यक्ष युद्धजन्य कारवाई आहे. अशा परिस्थितीत त्याला प्रत्युत्तर देणे हा इराणचा अधिकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच इराणी सैन्य कोणत्याही संभाव्य युद्धासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचा दावा त्यांनी केला.
रेजाई यांनी म्हटले, “आम्ही अमेरिकन सैन्याला सल्ला देतो की त्यांनी त्वरित ही नाकेबंदी हटवावी. अन्यथा ओमान समुद्र तुमच्यासाठी स्मशानभूमी बनेल.” या वक्तव्यामुळे मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जागतिक अर्थव्यवस्थेवरही परिणामाची भीती
इराणने अमेरिकेच्या घेराबंदीमुळे केवळ इराणलाच नव्हे, तर संपूर्ण जगाला आर्थिक फटका बसू शकतो, असा दावा केला आहे. जागतिक व्यापार आणि तेलवाहतुकीसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनी परिसरातील तणाव वाढल्यास आंतरराष्ट्रीय बाजारपेठांवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
मोहसेन रेजाई यांनी सांगितले की, “अमेरिका जितका काळ इराणची नौदल नाकेबंदी कायम ठेवेल, तितके अधिक नुकसान जगभरातील देशांना सहन करावे लागेल.” दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
ट्रम्प यांचाही इराणला इशारा
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही इराणला कठोर शब्दांत इशारा दिला आहे. ट्रम्प म्हणाले, “इराणकडे आता फार कमी वेळ उरला आहे. त्यांनी अमेरिकेच्या शांतता प्रस्तावावर त्वरीत निर्णय घेतला नाही, तर तिथे काहीही उरणार नाही.”
अमेरिकेच्या इराणसमोर ५ प्रमुख अटी
काही दिवसांपूर्वी अमेरिकेने इराणसमोर चर्चेसाठी पाच अटी ठेवल्या होत्या. त्यामध्ये:
- संवर्धित युरेनियम अमेरिकेकडे सुपूर्द करणे
- फक्त एकच अणुऊर्जा केंद्र सुरू ठेवणे
- नुकसानभरपाईची मागणी मागे घेणे
- सर्व आघाड्यांवरील संघर्ष थांबवणे
- इराणची जप्त मालमत्ता गोठवून ठेवणे
या अटींचा समावेश होता.
इराणनेही मांडल्या प्रत्युत्तरात ५ अटी
अमेरिकेच्या प्रस्तावाला प्रत्युत्तर देताना इराणनेही स्वतःच्या पाच अटी मांडल्या आहेत. त्यामध्ये:
- लेबनॉनसह संपूर्ण प्रदेशातील लष्करी कारवाया थांबवणे
- इराणवरील आर्थिक निर्बंध हटवणे
- जप्त इराणी मालमत्ता मुक्त करणे
- युद्धातील नुकसानीची भरपाई देणे
- होर्मुझ सामुद्रधुनीवरील इराणच्या सार्वभौमत्वाची मान्यता देणे
या मागण्यांचा समावेश आहे.
सध्या दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण शांतता कायम असून, आगामी काळात अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा कोणत्या दिशेने जाते याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

