( मुंबई )
रितेश देशमुख यांचा ड्रीम प्रोजेक्ट ठरलेला राजा शिवाजी चित्रपट बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक यश संपादन करत आहे. प्रदर्शनानंतर अवघ्या तीन आठवड्यांत या चित्रपटाने तब्बल ११४ कोटी रुपयांची कमाई करत मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला आहे. यासह सैराट चित्रपटाचा गेल्या दशकभरापासून कायम असलेला विक्रमही मोडीत निघाला आहे.
निर्मात्यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, ‘राजा शिवाजी’ने भारतात ९३.१० कोटी रुपयांची कमाई केली असून परदेशातही चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. ओव्हरसीज मार्केटमध्ये चित्रपटाने ४.९० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. एकूण जागतिक कमाई ११४ कोटींच्या घरात पोहोचली असून, मराठी चित्रपटसृष्टीतील हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
पहिल्याच दिवशी ऐतिहासिक ओपनिंग
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत १ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ११.३५ कोटी रुपयांची दमदार ओपनिंग केली होती. तर पहिल्या आठवड्यातच चित्रपटाने ५७.७० कोटींचा टप्पा पार केला. तिसऱ्या वीकेंडलाही थिएटर्सबाहेर प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. उत्कृष्ट ‘वर्ड ऑफ माउथ’, भव्य सेट्स, दमदार अभिनय आणि प्रभावी कथानकामुळे प्रेक्षक पुन्हा पुन्हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरकडे वळत असल्याचे चित्र आहे.
राजा शिवाजी हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असून, मराठीसोबत हिंदी भाषेतही प्रदर्शित करण्यात आला आहे. महाराष्ट्रात मराठी आवृत्तीला प्रचंड प्रतिसाद मिळत असतानाच हिंदी प्रेक्षकांनीही चित्रपटाला पसंती दिली आहे.
दमदार स्टारकास्टमुळे चित्रपटाची चर्चा
या चित्रपटात बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार झळकले आहेत. अभिषेक बच्चन, संजय दत्त आणि सलमान खान यांसारख्या मोठ्या कलाकारांच्या उपस्थितीमुळे चित्रपटाची भव्यता आणखी वाढली आहे. विशेष म्हणजे, महाराजांप्रती आदर आणि सेवाभाव म्हणून अनेक कलाकारांनी कोणतेही मानधन न घेता या चित्रपटात काम केल्याची माहिती रितेश देशमुख यांनी एका मुलाखतीत दिली होती.
देशमुख कुटुंबासाठी खास ठरला ‘राजा शिवाजी’
हा चित्रपट रितेश देशमुख यांच्यासाठी अत्यंत खास मानला जात आहे. कारण या सिनेमात देशमुख कुटुंबातील अनेक सदस्यांनी अभिनय केला आहे. जिनिलिया देशमुख यांच्यासह रियान आणि राहिल या त्यांच्या दोन्ही मुलांनीही चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. तसेच रितेश यांचे बंधू धीरज देशमुख हे देखील चित्रपटातील एका गाण्यात झळकले आहेत.
मराठी चित्रपटसृष्टीला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून देणाऱ्या या चित्रपटाच्या यशामुळे सध्या संपूर्ण मनोरंजन विश्वात ‘राजा शिवाजी’चीच जोरदार चर्चा रंगली आहे.

