बँकॉकमध्ये झालेल्या वर्ल्ड आर्चरी पॅरा सिरीज स्पर्धेत भारताच्या उदयोन्मुख पॅरा-तिरंदाज पायल नाग हिने महिलांच्या कंपाऊंड ओपन वैयक्तिक गटात सुवर्णपदक पटकावत शानदार कामगिरी केली. अंतिम सामन्यात तिने विद्यमान विश्वविजेती शीतल देवी हिचा 139-136 असा पराभव करत कारकिर्दीतील सर्वात मोठा विजय नोंदवला. सामन्याची सुरुवात अत्यंत चुरशीची झाली. पहिल्या दोन फेऱ्यांनंतर दोन्ही खेळाडू 54 गुणांवर बरोबरीत होत्या. मात्र, पुढील फेऱ्यांमध्ये पायलने अचूकता आणि आत्मविश्वास दाखवत निर्णायक आघाडी घेतली आणि सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
पात्रता फेरीत शीतल देवीने 698 (25X) गुणांसह अव्वल स्थान पटकावले होते, तर पायल नागने 678 (9X) गुणांसह तिसरे स्थान मिळवले. उपांत्य फेरीत शीतलने सिंगापूरच्या नूर शाहिदा अलीमला 147-142 ने पराभूत केले, तर पायलने कझाकस्तानच्या जनात ऐतिमोवावर 144-140 अशी मात करत अंतिम फेरी गाठली. या स्पर्धेत पायल नागने आधीच शीतल देवीसोबत महिला दुहेरी प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. मात्र वैयक्तिक अंतिम फेरीत तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत दबावाखाली अप्रतिम खेळ केला.
प्रेरणादायी प्रवास
ओडिशाच्या बलांगीर जिल्ह्यातील पायल नागची कहाणी अत्यंत प्रेरणादायी आहे. 2015 मध्ये एका अपघातात तिने दोन्ही हात आणि पाय गमावले. तरीही हार न मानता तिने कटरा येथील माता वैष्णो देवी श्राइन बोर्ड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये प्रशिक्षण घेतले. 2025 मध्ये राष्ट्रीय स्तरावर पदार्पण केल्यानंतर तिने कमी कालावधीतच मोठी कामगिरी करून दाखवली.
इतर स्पर्धांमध्येही भारताचा दबदबा
पुरुषांच्या कंपाऊंड प्रकारात टॉमन कुमारनं याने ऑस्ट्रेलियाच्या जोनाथन मिल्नवर 146-142 अशी मात करत सुवर्णपदक पटकावले. तसेच महिला रिकर्व्ह प्रकारात भावना हिने थायलंडच्या पत्थाराफोन पट्टावाओवर 6-0 असा एकतर्फी विजय मिळवला. दरम्यान, पॅरालिम्पिक विजेता हरविंदर सिंग याला पुरुषांच्या रिकर्व्ह अंतिम फेरीत इंडोनेशियाच्या प्रतिस्पर्ध्याकडून पराभव पत्करावा लागला आणि त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
भारताची पदकतालिकेत अव्वल झेप
या स्पर्धेत भारताने एकूण 7 सुवर्ण, 3 रौप्य आणि 3 कांस्य पदकांची कमाई करत पॅरा-तिरंदाजीमध्ये आपले वाढते वर्चस्व सिद्ध केले आणि पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले.

