( मुंबई )
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षातील अंतर्गत अस्वस्थता पुन्हा एकदा चर्चेत आली असून, पक्षात मोठे फेरबदल किंवा संभाव्य फुटीच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या पत्रातून वरिष्ठ नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची नावे वगळण्यात आल्याने या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.
काही दिवसांपूर्वी पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या पत्रात तटकरे आणि पटेल यांच्या नावांचा उल्लेख नसल्याचे समोर आले होते. विशेष म्हणजे, अशा प्रकारची घटना दोन वेळा घडल्याची चर्चा असून त्यामुळे पक्षातील अंतर्गत नाराजी उघडपणे समोर येत असल्याचे मानले जात आहे.
या पार्श्वभूमीवर तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतलेली भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीनंतर शरद पवारांनी केलेल्या सूचक वक्तव्यामुळे चर्चांना आणखी उधाण आले आहे.
शरद पवार म्हणाले, “दुसऱ्या पक्षात काय सुरू आहे, यावर भाष्य करण्याची गरज नाही. मात्र, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अनेक वर्षे माझ्यासोबत काम केले आहे. त्यांनी विविध जबाबदाऱ्या सक्षमपणे सांभाळल्या आहेत. त्यांच्या क्षमतेची मला पूर्ण जाणीव आहे. कदाचित त्यांच्या सध्याच्या नेतृत्वाचे त्यांच्याबाबत वेगळे मत असू शकते.” दरम्यान, सुनील तटकरे यांनी शरद पवारांची भेट ही केवळ तब्येतीची विचारपूस करण्यासाठी असल्याचे स्पष्ट केले असले, तरी त्यानंतर झालेल्या राजकीय प्रतिक्रिया आणि चर्चांमुळे पक्षातील अंतर्गत मतभेद पुन्हा अधोरेखित झाले आहेत.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी मोठा दावा करत “सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि २२ आमदार भविष्यात भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतात,” असे वक्तव्य केले होते. या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
पक्षातील अस्वस्थतेचे आणखी एक उदाहरण म्हणजे माजी खासदार आणि पक्ष प्रवक्ते आनंद परांजपे यांचा राजीनामा मानला जात आहे. सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या जागेचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी परांजपे इच्छुक होते. मात्र, अंतर्गत चर्चांमध्ये त्यांना दुय्यम स्थान दिल्याची भावना असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, पक्षात पवार कुटुंबाचे वाढते वर्चस्वही चर्चेचा विषय ठरत आहे. सुनेत्रा पवार यांनी मोठे पुत्र पार्थ पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे, तर धाकटे पुत्र जय पवार यांच्याकडे पक्ष सचिवपदासह शिस्तपालन समिती आणि आर्थिक व्यवहारांच्या देखरेखीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पक्षाच्या निधी आणि बँक खात्यांवरील नियंत्रणही आता पवार कुटुंबाच्या मंजुरीशिवाय शक्य नसल्याची चर्चा असून, निर्णय प्रक्रियेवर कुटुंबाचे पूर्ण वर्चस्व निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी पक्षाच्या आर्थिक व्यवहारांमध्ये अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि वाय. पी. त्रिवेदी हे अधिकृत स्वाक्षरीकर्ते होते.
या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षातील अंतर्गत समीकरणे वेगाने बदलत असल्याचे संकेत मिळत असून, आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

