( पुणे )
पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात एका महिलेवर धावत्या कारमध्ये अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघा आरोपींना अटक केली असून, घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती देताना अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितले की, रविवारी रात्री संबंधित महिला आपल्या तीन मैत्रिणींसोबत कोरेगाव पार्क परिसरातील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेली होती. जेवण आटोपल्यानंतर तिच्या तिन्ही मैत्रिणी घरी निघून गेल्या, तर संबंधित महिला ओला कॅबची वाट पाहत हॉटेल परिसरात थांबली होती. यावेळी तिच्या शेजारी बसलेल्या दोन व्यक्तींनी बोलण्याच्या बहाण्याने तिच्याशी ओळख वाढवली. काही वेळ संभाषण केल्यानंतर ते दुसऱ्या हॉटेलकडे जात असल्याचे सांगत त्यांनी महिलेला वाटेत सोडण्याची ऑफर दिली. महिलेने त्यांच्या कारमध्ये बसल्यानंतर आरोपींनी तिच्यावर धावत्या गाडीत अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
दरम्यान, महिलेने प्रतिकार करत कार थांबवण्याची मागणी केली. त्यानंतर ती कारमधून खाली उतरली आणि सुरक्षित ठिकाणी जाऊन पोलिसांशी संपर्क साधला. घटनेनंतर आरोपी तेथून फरार झाले होते. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत तिघा आरोपींना अटक केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
गेल्या काही दिवसांत पुण्यासह राज्यभरात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कोरेगाव पार्कसारख्या उच्चभ्रू आणि वर्दळीच्या परिसरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

