( मुंबई )
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. मुंबई महापालिकेच्या 227 जागांपैकी तब्बल 150 जागांवर भाजप आणि शिवसेनेचं एकमत झालं असून, याबाबत दोन्ही पक्षांनी संयुक्त घोषणा केली आहे. उर्वरित 77 जागांबाबत लवकरच निर्णय होणार असल्याची माहिती महायुतीच्या नेत्यांनी दिली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात भाजप–शिवसेनेची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईतील जागावाटप करताना ‘जिंकून येण्याची क्षमता’ हाच प्रमुख निकष ठेवण्यात आल्याचे महायुतीच्या नेत्यांनी स्पष्ट केले. विद्यमान जागा कुणाकडे आहे यापेक्षा कोणत्या जागेवर महायुतीचा उमेदवार निश्चितपणे विजयी होऊ शकतो, यावर चर्चा केंद्रित होती.
महायुतीच्या नेत्यांनी सांगितले की, 227 पैकी 150 पेक्षा अधिक जागा जिंकण्याच्या उद्दिष्टाने जागावाटप निश्चित करण्यात आले आहे. या टप्प्यावर कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, याचा तपशील मात्र जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र, 150 जागा सहज जिंकू असा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, उर्वरित 77 जागांबाबत शिवसेना, भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) यांच्यात चर्चा सुरू असून, येत्या दोन दिवसांत या जागांचंही वाटप पूर्ण होईल असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला आहे. जर जागावाटपात अडचण निर्माण झाली, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः हस्तक्षेप करून तोडगा काढतील, असेही स्पष्ट करण्यात आले.
जागावाटप प्रक्रियेत बंडखोरीची कोणतीही शक्यता नसल्याचा निर्वाळा महायुतीच्या नेत्यांनी दिला आहे. सुरुवातीच्या एक-दोन फेऱ्यांतच निम्म्यापेक्षा जास्त जागांवर सहमती झाल्यामुळे, उर्वरित 77 जागांचं वाटपही सुरळीत होईल, असा आत्मविश्वास महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये दिसून येत आहे.

