(पुणे)
विद्यार्थ्यांसह नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या अनधिकृत लोन अॅपविरोधात पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी महत्त्वपूर्ण कारवाई करत गुगल प्ले स्टोअरवरील पाच संशयित अॅप हटवण्यात यश मिळवले आहे. या कारवाईमुळे अनेक नागरिकांचे कोट्यवधी रुपयांचे संभाव्य नुकसान टळले आहे.
अलीकडच्या काही दिवसांपासून नागरिकांकडून अनधिकृत लोन अॅपमार्फत फसवणुकीच्या तक्रारी सायबर पोलिसांकडे सातत्याने येत होत्या. तपासाअंती हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरून सहज उपलब्ध असल्याचे आणि त्यांचा वापर करून लोकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे उघड झाले.
तपासादरम्यान या अॅप्सकडे आरबीआय किंवा सेबीची अधिकृत परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे आणि सहायक निरीक्षक प्रविण स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली गुगलशी संपर्क साधून ‘क्रेडिट लेन्स’, ‘रॅकप्म्टा’, ‘आरपीएमटीए’, ‘क्रेडिट पायलट’ आणि ‘रेबा रोख’ ही पाच अॅप प्ले स्टोअरवरून हटवण्यात आली आहेत. याशिवाय ‘कीक्रेडिट’, ‘एससी एलिट व्हीआयपी’, ‘लुमेनमॅक्स’, ‘रूपांतरण’ या अॅप्सविरोधात कारवाईसाठी देखील पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या संदर्भात गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करत सांगितले की, “कोणतेही लोन अॅप वापरण्यापूर्वी ते आरबीआय किंवा सेबीकडे नोंदणीकृत आहे की नाही, याची खातरजमा करणे अत्यावश्यक आहे. फसवणुकीपासून वाचण्यासाठी अधिकृत अॅप्सचा वापरच करावा.”