(मुंबई)
कोकणवासीयांसाठी महत्त्वाची मानली जाणारी दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडी तातडीने सुरू करा, अन्यथा दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया गाड्या दादर स्थानकां पुढे जाऊ देणार नाही, असा स्पष्ट इशारा शिवसेना नेते व माजी खासदार विनायक राऊत यांनी रेल्वेला दिला आहे. जवळपास वीस वर्षे दादर जंक्शनवरून रत्नागिरीसाठी सुटणारी पॅसेंजर बंद करून त्याच प्लॅटफॉर्मवरून त्याच वेळेत गोरखपुर तसेच बलिया मार्गावर गाड्या चालवणाऱ्या मध्य रेल्वे प्रशासनाला माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी दणका दिला. दि. ९ जानेवारीला दिलेल्या पत्राची आठवण करून देत ही गाडी पूर्वीप्रमाणे दादर येथून सुटली नाही तर येत्या १ मार्चला गोरखपूर आणि बलिया ट्रेन सुटू देणार नाही, असा सज्जड लेखी इशारा कोकणवासीयांच्या वतीने मध्य रेल्वे प्रशासनाला देण्यात आला आहे. या भेटीत गाडी सुरू करण्याची ठाम मागणी करण्यात आली.
दादर-रत्नागिरी पॅसेंजर आणि दादर-सावंतवाडी गाड्या कोकणवासीयांसाठी जीवनरेखा होत्या. हजारो मध्यमवर्गीय प्रवाशांसाठी ही स्वस्त आणि सहज उपलब्ध सेवा होती. मात्र, कोरोना काळात ही सेवा बंद करण्यात आली. यामुळे केवळ प्रवाशांनाच नव्हे, तर रेल्वेवर अवलंबून असलेल्या लहान व्यावसायिकांनाही मोठा फटका बसला. त्यातच आता या वेळेत गोरखपूर आणि बरेली गाड्या सुरू करण्याचा घाटात रेल्वेने घातला आहे. पण कोकणवासीयांसाठीच्या पॅसेंजर गाड्या बंदच आहे.
“दादर-रत्नागिरी आणि दादर-सावंतवाडी ह्या पॅसेंजर ट्रेन पूर्वीच्या वेळेनुसार सुरु करण्यासंदर्भात आम्ही यापूर्वी दि.०१.०१.२०२५ रोजी आपणास भेटून विनंती केली होती. आपणही लवकरात लवकर सदर दोन्ही ट्रेन लवकरच सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आज सुमारे १९ दिवस होऊनही याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे दिसून येते. समस्त कोकणवासिय न्याय मागण्यासाठी सातत्याने आपणाकडे विनंतीवजा पाठपुरावा करीत असूनही आपणाकडून जाणूनबुजून दिरंगाई केली जात असल्याची शंका आम्हा सर्वांना येत आहे.
यास्तव पुनःश्च आपणास विनंती करण्यात येते की, दादर-रत्नागिरी आणि दादर-सावंतवाडी ह्या पॅसेंजर ट्रेन पूर्वीच्या वेळेनुसार तातडीने सुरु कराव्यात. यासंदर्भात रेल्वे विभागाकडून योग्य ती कार्यवाही न झाल्यास दि. १ मार्च २०२५ रोजी दादर स्टेशनवरून सुटणाऱ्या दादर-गोरखपूर आणि दादर-बरेली ह्या ट्रेनसमोर रेल रोको आंदोलन केले जाईल आणि दादर-गोरखपूर आणि दादर-बरेली ह्या रेल्वे सोडू दिल्या जाणार नाही कृपया याची नोंद घ्यावी.” अशा शब्दात हा इशारा माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी दिला आहे.
“दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया गाड्या सुरू करण्यात आम्हाला विरोध नाही. मात्र, कोकणवासीयांची दादर-रत्नागिरी पॅसेंजर सुरू न करता, इतर गाड्यांना प्राधान्य देणे हे कोकणवासीयांवर अन्याय आहे. या गाड्या सुरू होईपर्यंत आम्ही गोरखपूर गाडीला दादरहून पुढे जाऊ देणार नाही,” असा आक्रमक इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.