(चिपळूण)
मुंबईहून बहिणीसोबत गावी येत असताना धावत्या रेल्वेतून तोल जाऊन खाली पडल्याने १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते बौद्धवाडी परिसरात घडली. या घटनेमुळे कडवई परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ओंकार विजय गुरव (वय १९, रा. कुर्ला कमानी, मुंबई; मूळ रा. कडवई, ता. संगमेश्वर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार हा आपल्या बहिणीसोबत मुंबईहून कोकणात राहत्या गावी येत होता. शनिवार, १६ मे रोजी दुपारी १२:४० वाजण्याच्या सुमारास रेल्वे कळंबस्ते बौद्धवाडी परिसरातील रेल्वे पोल क्रमांक १३०/२० जवळ पोहोचली असता, दरवाज्याजवळ उभा असलेल्या ओंकारचा अचानक तोल गेला. त्यामुळे तो थेट धावत्या रेल्वेतून खाली कोसळला.
रेल्वे रुळाशेजारी गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. उन्हाळी सुट्टीत गावी येत असताना घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे गुरव कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून, मूळ गाव कडवई परिसरातही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

