(चिपळूण)
अलीकडच्या काळात चिपळूण शहर व परिसरात घरफोड्या आणि चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. विशेषतः गेल्या आठवड्यात झालेल्या १३ घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. यानंतर पोलिस प्रशासनाने सुरक्षा उपाययोजनांना गती दिली आहे..सध्या शहरात ३२ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असून, ते अपुरे ठरत असल्याचे नुकत्याच घडलेल्या घटना अधोरेखित करतात. त्यामुळे जिल्हा पोलिस प्रशासनाच्या सूचनेनुसार, शहरात आणखी ८६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच चिपळूण शहरात एकूण ११८ कॅमेरे कार्यरत असतील.
गेल्या सप्ताहात मुसळधार पावसाचा फायदा घेत राधाकृष्णनगरमधील ९ आणि खंड व गुहागर बायपास परिसरातील ४ सदनिकांमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोड्या केल्या. या परिसरांमध्ये सीसीटीव्ही नसल्यामुळे चोरट्यांचा मागोवा घेण्यात पोलिसांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पूर्वी नगरपरिषदेने काही प्रमुख चौकांमध्ये कॅमेरे बसविले होते, मात्र शहराचा विस्तार पाहता ही यंत्रणा अपुरी ठरते आहे. त्यामुळे आता टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आणण्याचा निर्णय घेतला आहे.
ताज्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून रात्रीच्या वेळेस गस्त वाढवण्यात आली आहे. दोन पथकं शहरात नियमित गस्त घालत असून, रात्री काम करणाऱ्या सुरक्षा रक्षक आणि अन्य कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे.