(दापोली)
दाभोळ रोडवरील निगडे फाटा येथे रविवारी (१७ मे) एसटी बस आणि डंपर यांच्यात साईड देताना झालेल्या धडकेत निगडे गावाची भव्य स्वागत कमान कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, कमानीचा मोठा मलबा तब्बल २४ तासांनंतरही रस्त्यावर पडून असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निगडे फाट्यावरून गावात प्रवेश करणाऱ्या मुख्य मार्गावर ही सिमेंट-काँक्रीटची स्वागत कमान उभारण्यात आली होती. रविवारी दुपारच्या सुमारास दाभोळ मार्गावरून जाणारी एसटी बस आणि डंपर एकमेकांना बाजू देत असताना दोन्ही वाहनांचा अंदाज चुकला. यावेळी दोन्ही वाहनांची जोरदार धडक थेट स्वागत कमानीला बसली.
धडक इतकी भीषण होती की, ही कमान क्षणार्धात कोसळून थेट रस्त्यावर पडली. घटनेनंतर काही काळ परिसरात घबराट निर्माण झाली होती. अपघातावेळी रस्त्यावर मोठी वाहतूक नसल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, कमानीचा मोठा मलबा अजूनही रस्त्यावरच असल्याने वाहनचालकांना वाहतूक करताना मोठी कसरत करावी लागत आहे. संबंधित विभागाने तातडीने मलबा हटवून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

