(रत्नागिरी /प्रतिनिधी)
आर्थिक परिस्थितीमुळे श्रवणदोषावरील उपचार आणि आवश्यक उपकरणे मिळविताना अडचणींचा सामना करणाऱ्या गरजू रुग्णांसाठी रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने दिलासादायक पाऊल उचलले आहे. रुग्णालयाच्या इतिहासात प्रथमच आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू रुग्णांना मोफत श्रवणयंत्रांचे वाटप करण्यात आले. कान, नाक व घसाशास्त्र विभागाच्या या उपक्रमामुळे श्रवणदोष असलेल्या रुग्णांना दैनंदिन संवाद अधिक सुलभ होण्यासह आत्मविश्वासाने जीवन जगण्यास मदत होणार आहे.
या उपक्रमासाठी कान, नाक व घसाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुनीता बागे यांनी विशेष पुढाकार घेतला. श्रवणदोष असलेल्या रुग्णांची तपासणी, श्रवण चाचणी आणि त्यांच्या गरजेनुसार योग्य श्रवणयंत्र उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या (एमजेपीजेएवाय) माध्यमातून पात्र रुग्णांना आवश्यक सुविधा मिळाव्यात, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना श्रवणयंत्रांसारखे महत्त्वाचे साधन उपलब्ध होण्याचा मार्ग सुकर झाला. या रुग्णाभिमुख उपक्रमाचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी कौतुक केले. गरजू रुग्णांच्या अडचणी ओळखून त्यांना आवश्यक आरोग्यसुविधा उपलब्ध करून देणे, ही सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेच्या सामाजिक बांधिलकीची महत्त्वपूर्ण बाजू असल्याचे त्यांनी नमूद केले. या उपक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल डॉ. बागे यांनी अधिष्ठाता आणि रुग्णालय प्रशासनाचे आभार मानले. श्रवणयंत्रे मिळाल्याने रुग्णांनी समाधान व्यक्त करीत डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनाप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
श्रवणदोषामुळे संवादात निर्माण होणारे अडथळे दूर करण्यासाठी श्रवणयंत्रे उपयुक्त ठरतात. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे अशी उपकरणे मिळविणे अनेक रुग्णांसाठी आव्हानात्मक ठरते. या पार्श्वभूमीवर रत्नागिरीच्या शासकीय रुग्णालयाने सुरू केलेला हा उपक्रम केवळ उपकरणवाटपापुरता मर्यादित न राहता, गरजू रुग्णांना अधिक सुलभ आणि सन्मानपूर्वक जीवन जगण्याची संधी देणारा ठरत आहे. सार्वजनिक आरोग्यसेवेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दिशेने रुग्णालयाने टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.


