(ठाणे / मुंबई)
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आणि शाहीर दादा कोंडके यांच्यासोबत रुपेरी पडदा गाजवणाऱ्या उषा चव्हाण यांनी राज्य सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांना मिळालेला ‘व्ही. शांताराम जीवनगौरव’ पुरस्कार परत केला आहे. पुण्यातील धनकवडी येथील जमिनीच्या TDR प्रकरणात न्याय मिळत नसल्याचा आरोप करत त्यांनी लालफितीच्या कारभारावर जोरदार टीका केली. उषा चव्हाण यांनी रविवारी हा पुरस्कार ठाण्यातील आनंदाश्रम येथे जाऊन आनंद दिघे यांच्या प्रतिमेसमोर ठेवत शासनाला परत केला. या घटनेमुळे राज्याच्या राजकीय आणि सांस्कृतिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
धनकवडी येथील मालकीच्या जमिनीच्या वादाबाबत काही दिवसांपूर्वी उषा चव्हाण यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना उद्देशून एक भावनिक व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर केला होता. त्यानंतर त्यांचे पती दत्तात्रय कडू-देशमुख यांनीही प्रसारमाध्यमांसमोर आपली बाजू मांडली होती.
माहितीनुसार, गेल्या 26 वर्षांपासून या जमिनीचा वाद न्यायालयात सुरू होता. अखेर न्यायालयाने त्यांचा मुलगा हृदयनाथ कडू-देशमुख यांचा जमिनीवरील दावा मान्य केला. मात्र, तरीही एका खासगी विकासकाने या जमिनीचा TDR स्वतःच्या नावावर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे संतप्त होत उषा चव्हाण यांनी शासनाचा सन्मानच परत करण्याचा निर्णय घेतला. “जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत पुरस्कारही नको,” अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूने लागूनही प्रत्यक्षात न्याय मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उषा चव्हाण यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांचा प्रश्न लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले जात आहे. नगरविकास खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याने त्या त्यांची प्रत्यक्ष भेट घेणार असल्याचेही समोर आले आहे.
दरम्यान, अभिनेते मंगेश देसाई यांनीही प्रतिक्रिया देत, “एकनाथ शिंदे हे कलाकारांवर प्रेम करणारे नेते आहेत. ते निश्चितच उषाताईंना न्याय मिळवून देतील,” असा विश्वास व्यक्त केला.
१९८० ते ९० च्या दशकात मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या उषा चव्हाण यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यांच्या योगदानाचा गौरव म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांना नुकताच ‘व्ही. शांताराम जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान केला होता.

