( रत्नागिरी / वार्ताहर )
राज्यातील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकणच्या पर्यटन व्यवसायावर यंदा मोठं संकट ओढवलं आहे. मे महिन्याच्या सुट्ट्या, समुद्रकिनारे आणि हापूस आंब्याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने कोकणात दाखल झालेल्या पर्यटकांमध्ये अचानक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जागतिक स्तरावर वाढलेली युद्धजन्य परिस्थिती, इंधनटंचाई आणि सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या ‘लॉकडाऊन’च्या चर्चांमुळे अनेक पर्यटकांनी आपला मुक्काम अर्धवट सोडून परतीचा मार्ग धरल्याचे चित्र सध्या रत्नागिरीसह संपूर्ण कोकणात पाहायला मिळत आहे.
याचा थेट फटका कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या पर्यटन आणि हापूस आंबा व्यवसायाला बसू लागला आहे. रिसॉर्ट, होमस्टे, हॉटेल, वाहन व्यवसाय, स्थानिक दुकानदार, समुद्रकिनाऱ्यावरील छोटे व्यावसायिक आणि आंबा बागायतदार मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
गॅस टंचाईमुळे हॉटेल व्यवसाय ठप्प
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून घरगुती आणि व्यावसायिक गॅसचा तुटवडा तीव्र झाला आहे. अनेक हॉटेल चालकांना गॅस सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आली आहे. काही ठिकाणी पारंपरिक चुलींवर स्वयंपाक सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे जेवणाच्या दरात मोठी वाढ झाली असून पर्यटकांनाही त्याचा आर्थिक फटका बसत आहे. काही लोकप्रिय पर्यटनस्थळांवर साध्या थाळीचे दरही मोठ्या प्रमाणात वाढल्याची चर्चा आहे.
पेट्रोल आणि सीएनजी पंपांवर लांबच लांब रांगा
इंधनटंचाईचा परिणाम वाहतुकीवरही दिसून येत आहे. जिल्ह्यातील अनेक पेट्रोल आणि सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पर्यटकांचा मोठा वेळ केवळ इंधन मिळवण्यासाठी रांगेत उभे राहण्यात जात असल्याने नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही पर्यटकांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत कोकणातील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. “सुट्टी एन्जॉय करण्याऐवजी अर्धा दिवस पेट्रोल पंपावर जातोय,” अशी प्रतिक्रिया अनेक पर्यटक देताना दिसत आहेत.
लॉकडाऊनच्या अफवांमुळे बुकिंग रद्द
सोशल मीडियावर पुन्हा लॉकडाऊन लागू होणार असल्याच्या अफवा वेगाने पसरत आहेत. भविष्यात प्रवासावर निर्बंध येऊ शकतात किंवा इंधन पूर्णपणे संपुष्टात येईल, या भीतीने हजारो पर्यटकांनी हॉटेल आणि रिसॉर्ट बुकिंग रद्द केल्याची माहिती पर्यटन व्यावसायिकांकडून देण्यात येत आहे. यामुळे होमस्टे चालक, रिसॉर्ट मालक, टुरिस्ट वाहन चालक, गाईड आणि समुद्रकिनाऱ्यावरील छोटे व्यावसायिक मोठ्या आर्थिक अडचणीत आले आहेत. मे महिना हा कोकणातील पर्यटन व्यवसायासाठी सर्वाधिक कमाईचा काळ मानला जातो. मात्र यंदा अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे व्यवसाय कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
‘कोकणचा राजा’ हापूसही संकटात
पर्यटनातील मंदीचा सर्वाधिक परिणाम कोकणच्या प्रसिद्ध हापूस आंब्यावर झाला आहे. मे महिन्याच्या अखेरीस पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात आंब्याची खरेदी होते. त्यामुळे बागायतदारांना चांगला दर मिळतो. मात्र यंदा पर्यटकांची संख्या घटल्याने आंब्याच्या मागणीत मोठी घट झाली आहे.
काही दिवसांपूर्वी 600 ते 800 रुपये डझन दराने विकला जाणारा हापूस आंबा आता 200 ते 400 रुपयांपर्यंत घसरल्याचं चित्र बाजारात दिसत आहे. त्यामुळे बागायतदारांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
अवकाळी पाऊस आणि कमी दरांचा दुहेरी फटका
यंदा आधीच अवकाळी पावसामुळे हापूस उत्पादनावर मोठा परिणाम झाला होता. अनेक बागायतदारांचे नुकसान झाले. त्यात आता बाजारभाव कोसळल्याने उत्पादन खर्च काढणेही कठीण झाले आहे. “आधी उत्पादन घटलं, आता दर कोसळले; नेमकं करायचं काय?” असा सवाल आंबा उत्पादकांकडून विचारला जात आहे.
प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी
एकीकडे वाढती महागाई आणि दुसरीकडे पर्यटन व आंबा व्यवसायातील मंदी यामुळे रत्नागिरीतील व्यापारी, पर्यटन व्यावसायिक आणि शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर नियंत्रण आणावं, इंधन आणि गॅस पुरवठा सुरळीत करावा तसेच पर्यटन व्यवसायाला दिलासा देण्यासाठी तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. ही परिस्थिती लवकर सुधारली नाही तर कोकणच्या पर्यटन हंगामावर यंदा मोठा आर्थिक परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

