(रत्नागिरी /प्रतिनिधी)
तालुक्यातील पाली-कशेळी परिसरात भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या मोबाईल नेटवर्क सेवेचा अक्षरशः बोजवारा उडाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून नेटवर्क वारंवार खंडित होत असल्याने मोबाईल कॉल, इंटरनेट सेवा तसेच ऑनलाईन व्यवहारांवर मोठा परिणाम होत आहे.
कशेळीसह परिसरातील अनेक गावांमध्ये मोबाईलला नेटवर्कच मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी कॉल लागत नसल्याने तर इंटरनेट पूर्णपणे बंद पडल्याने विद्यार्थी, व्यावसायिक, शासकीय कामकाज करणारे नागरिक आणि ऑनलाईन व्यवहार करणारे व्यापारी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील अनेक नागरिक बीएसएनएल सेवेला प्राधान्य देतात. मात्र, वारंवार उद्भवणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे ग्राहकांचा संयम सुटू लागला आहे. “मोबाईल हातात असूनही संपर्क होत नाही, इंटरनेट सेवा ठप्प असल्याने दैनंदिन कामे खोळंबत आहेत,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
ऑनलाईन कामे, शासकीय संकेतस्थळांवरील अर्ज प्रक्रिया तसेच डिजिटल व्यवहारांमध्ये सातत्याने अडथळे निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. दरम्यान, अनेक वेळा बीएसएनएलच्या संबंधित अधिकाऱ्यांना कॉल केल्यास प्रतिसाद दिला जात नाही. बीएसएनएल प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. संबंधित विभागाने तातडीने नेटवर्क समस्या दूर करून सेवा सुरळीत करावी, अशी मागणी आता ग्रामस्थ राकेश कांबळे यांनी माध्यमांद्वारे केली आहे.
सध्या कशेळी परिसरात बीएसएनएल नेटवर्कची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. येत्या काही दिवसांत शाळांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार असून विद्यार्थ्यांचे ऑनलाईन फॉर्म भरणे, कागदपत्रे अपलोड करणे आणि विविध शासकीय पोर्टलवरील प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असते. मात्र, अशाच प्रकारे नेटवर्क सतत खंडित होत राहिले तर विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे. ग्रामीण भागातील अनेक पालक आणि विद्यार्थी बीएसएनएल नेटवर्कवर अवलंबून आहेत. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेपूर्वीच संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालून नेटवर्क सेवा सुरळीत करावी. अन्यथा विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये तीव्र संताप निर्माण होऊ शकतो.
— राकेश कांबळे, कशेळी स्थानिक ग्रामस्थ.

