(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
गैरप्रकारमुक्त आणि पारदर्शक परीक्षा घेण्याच्या दृष्टीने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी–बारावीच्या सर्व परीक्षा केंद्रांतील प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निर्देश दिले आहेत. कोकण विभागीय मंडळांतर्गत एकूण १७५ परीक्षा केंद्रांपैकी आतापर्यंत ७० केंद्रांवर (सुमारे ४० टक्के) सर्व वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित १०५ केंद्रांवरील संस्थाचालक व प्राचार्यांच्या बैठका घेऊन पुढील दहा दिवसांत कॅमेरे बसविण्याच्या स्पष्ट सूचना विभागीय मंडळाने दिल्या आहेत.
चालू शैक्षणिक वर्षात सर्व परीक्षा केंद्रांवरील केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व संबंधित कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्यात येणार असून परीक्षा केंद्राबाहेरील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक–कर्मचाऱ्यांमधूनच नियुक्त्या केल्या जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, रत्नागिरी व सिंधुदुर्ग यांना आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, सोमवार, १२ जानेवारीपासून बारावीचे हॉल तिकीट ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य मंडळाकडून बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत होणार असून, त्याआधी तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आल्या आहेत. दहावीची लेखी परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान, तर तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा २ ते १८ फेब्रुवारीदरम्यान पार पडणार आहेत.
१३ मे २०२५ च्या शासन निर्णयानुसार शाळा व परिसरात सीसीटीव्ही बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार फेब्रुवारी–मार्च २०२६ मधील दहावी–बारावी परीक्षांसाठी निश्चित केलेल्या सर्व केंद्रांवरील परीक्षेशी संबंधित प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही बसविणे अनिवार्य असल्याचे ९ डिसेंबरच्या राज्यमंडळाच्या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. बसविण्यात आलेल्या कॅमेर्यांची तपासणी दक्ष क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून केली जात असून, प्रत्येक केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज जतन ठेवण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
विभागीय मंडळ स्तरावर संवेदनशील व उपद्रवी परीक्षा केंद्रांची स्वतंत्र यादी निश्चित करण्यात येणार असून, तेथे कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी विभागीय मंडळ व जिल्हा प्रशासनाकडून विशेष लक्ष दिले जाणार आहे. अशा केंद्रांवरील सीसीटीव्हीचे ऑनलाइन फुटेज जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समितीकडे देण्यात येणार आहे. परीक्षा काळात राज्यमंडळ व विभागीय मंडळ कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार असून, कॅमेर्यांद्वारे किती संवेदनशील केंद्रांवर थेट नियंत्रण ठेवता येईल, याची चाचणी सुरू आहे. ज्या केंद्रांवर गैरप्रकार आढळतील, तेथे तात्काळ निर्णय घेऊन कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
मागील फेब्रुवारी–मार्च २०२५ मधील दहावीच्या परीक्षेत भरारी पथकाला एकही गैरप्रकार आढळला नव्हता, तर बारावीच्या परीक्षेत एका केंद्रावर एकमेव कॉपीचा प्रकार निदर्शनास आला होता. त्या काळात दहावी–बारावीच्या एकाही केंद्राची मान्यता रद्द करण्यात आलेली नव्हती, तसेच चालू वर्षी कोणत्याही नव्या केंद्राला मान्यता देण्यात आलेली नाही. कोकण विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रात एकूण १७५ परीक्षा केंद्रे असून त्यापैकी दहावीची ११४ व बारावीची ६१ केंद्रे आहेत. परीक्षांसाठी ३,०४० वर्गखोल्यांची आवश्यकता असून आतापर्यंत १,०१२ खोल्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. उर्वरित १,३२८ वर्गखोल्यांमध्ये तातडीने कॅमेरे बसविण्याचे निर्देश संबंधित संस्थांना देण्यात आले आहेत.
चालू वर्षी जिल्हा स्तरीय दक्षता समितीचे पुनर्गठन करण्यात आले असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यांची समिती कार्यरत राहणार आहे. त्यात वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्याचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.
ऑनलाइन आवेदनपत्र भरण्याची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली असून बारावीकरिता २१ जानेवारीपर्यंत, तर दहावीकरिता ३० जानेवारीपर्यंत अतिविलंब शुल्कासह अर्ज स्वीकारले जाणार आहेत. १० जानेवारीअखेर कोकण विभागीय मंडळात दहावीचे २५,०४८ आणि बारावीचे २३,९९४ आवेदनपत्र ऑनलाइन भरले गेले आहेत.
शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना बोर्ड परीक्षेचे कामकाज नियोजनबद्ध करता यावे, यासाठी विभागीय मंडळाने “बोर्ड परीक्षेचा राजमार्ग : सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे” ही नाविन्यपूर्ण पुस्तिका प्रकाशित केली असून, त्यात महिनानिहाय प्रशासकीय व शैक्षणिक कामकाजाचे मार्गदर्शन देण्यात आले आहे. यासोबतच ‘परीक्षा पे चर्चा’सारखे उपक्रम राबवून विद्यार्थी, पालक व शिक्षकांचा सहभाग वाढविण्यात येणार आहे.
बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त आणि निकोप वातावरणात पार पडाव्यात, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री, सहपालकमंत्री, लोकप्रतिनिधी, पालकसचिव, स्थानिक प्रतिष्ठित नागरिक व नामवंत व्यक्ती यांच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक व शिक्षकांना आवाहन करणारे विनंतीपत्र देण्यात येणार असल्याची माहिती विभागीय सचिव पुनिता गुरव यांनी दिली.

