(दापोली/ प्रतिनिधी)
दापोली एसटी स्थानकाच्या पाठीमागील उर्दू शाळेजवळ बसला साईड देण्याच्या किरकोळ कारणावरून एसटी वाहकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सरकारी कर्तव्य बजावत असताना झालेल्या या हल्ल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून दापोली पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एसटी बस क्रमांक एमएच १४ बीटी २५३८ ही बस १३ मे रोजी दुपारी कोंडे-करंजाणी येथून दापोलीकडे येत होती. बस चालक आशिष मळेकर आणि वाहक शिवनाथ बन्शी नाकाडे हे नियमित सरकारी सेवा बजावत होते. दुपारी सुमारे १.२५ वाजण्याच्या सुमारास बस उर्दू शाळेजवळ पोहोचली असता रस्ता देण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. यावेळी शेखर चंद्रकांत कालेकर, रंजित राजेंद्र यादव आणि साहिल इरशाद शार्दुला यांनी बस अडवून चालकाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात आले. वाद वाढत असताना मध्यस्थी करण्यासाठी पुढे आलेल्या वाहक शिवनाथ नाकाडे यांच्यावर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी तसेच दगडाने हल्ला केला. या मारहाणीत ते जखमी झाले.
भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जखमी वाहकाने दिलेल्या फिर्यादीवरून दापोली पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १३२, १२१(१) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. लोकसेवकावर हल्ला करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून संबंधित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

