(खेड / वार्ताहर)
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर असताना भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांनी दहिवली गावातील दरड कोसळून झालेल्या नुकसानीचा प्रश्न त्यांच्या निदर्शनास आणून दिला. तसेच दरडग्रस्त स्थानिक नागरिकांच्या पुनर्वसनासाठी तातडीने मदत मिळावी, अशी मागणी करणारे निवेदन मंत्री बावनकुळे यांना सादर केले.
या निवेदनाची तत्काळ दखल घेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दहिवलीतील बाधित कुटुंबांना घरबांधणीसाठी प्रत्येकी दोन लाख रुपये मदत मंजूर केली. तसेच बाधित नागरिकांना आणखी मदत मिळावी यासाठी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानीचा सविस्तर अहवाल तयार करून शासनाकडे सादर करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.
विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार आणि भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांच्या मागणीमुळे दहिवली गावातील दरडग्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शासनाकडून तातडीने मदत मंजूर झाल्याने बाधित कुटुंबांना घरबांधणी व पुनर्वसनाच्या दृष्टीने मोठी मदत होणार आहे.

