(संगमेश्वर / एजाज पटेल)
स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि अद्वितीय शौर्याचे प्रतीक असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६९ व्या जयंतीनिमित्त संगमेश्वर तालुक्यात ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळाला. रत्नागिरी जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच कसबा, संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकास रत्नागिरी पोलीस दलाच्या बँड पथकासह औपचारिक मानवंदना देण्यात आली. या अभूतपूर्व सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर देशभक्ती आणि अभिमानाच्या भावनेने भारावून गेला.
या विशेष कार्यक्रमासाठी रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे (भा.पो.से.) यांनी स्वतः उपस्थित राहून महाराजांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर पोलीस बँड पथकाने शिस्तबद्ध धून वाजवत छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाला आणि बलिदानाला सलामी दिली. सार्वजनिकरित्या स्मारकासमोर पोलीस बँड पथकासह मानवंदना देण्याची जिल्हा पोलीस दलाची ही पहिलीच वेळ असल्याने या कार्यक्रमाला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले.
यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक नितीन बगाटे भावूक झाले. त्यांनी सांगितले की, “छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त ही मानवंदना देण्याचा पहिला मान रत्नागिरी पोलीस दलाला मिळणे, हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. वैयक्तिकरित्या हा क्षण माझ्यासाठी अधिक भावनिक आहे, कारण मी ज्या छत्रपती संभाजीनगर शहरातून आलो आहे, त्या शहराला महाराजांचे नाव लाभले आहे. आज संगमेश्वरच्या या पवित्र भूमीत महाराजांच्या स्मारकासमोर नतमस्तक होण्याचे आणि पोलीस दलातर्फे मानवंदना देण्याचे सौभाग्य लाभले, ही माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय घटना आहे.”
कार्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, जिल्ह्यातील विविध पोलीस अधिकारी, अंमलदार आणि पोलीस बँड पथक उपस्थित होते. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी परिसरातील नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती.
छत्रपती संभाजी महाराजांचा शौर्यवारसा आणि स्वराज्याचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी पोलीस दलाने घेतलेला हा उपक्रम सर्व स्तरांतून कौतुकास्पद ठरत आहे. पोलीस बँडच्या निनादात आणि ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’च्या घोषणांनी संगमेश्वरची भूमी दुमदुमून गेली.

