( मुंबई )
राज्यातील खासगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून केली जाणारी मनमानी भाडेवाढ, अनधिकृत मोबाईल ॲप्सद्वारे होणारी बुकिंग आणि प्रवाशांची आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणी विशेष समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले असून, खासगी बस वाहतूक क्षेत्रातील गैरप्रकारांवर आता कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.
मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत खासगी बस ऑपरेटर्सकडून सणासुदीच्या काळात आणि सुट्ट्यांमध्ये प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा तिकीट दर आकारले जात असल्याबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. अनेक ट्रॅव्हल्स कंपन्या अनधिकृत मोबाईल ॲप्सच्या माध्यमातून बुकिंग करत असल्याच्या तक्रारी वाढत असल्याने राज्य सरकारने या प्रकाराला आळा घालण्याचा निर्णय घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर सह परिवहन आयुक्त आणि ‘सुराज्य अभियान’च्या तीन प्रतिनिधींचा समावेश असलेली विशेष समिती गठित करण्यात येणार आहे. ही समिती खासगी बसच्या भाडेवाढीवर नियंत्रण, अवैध बुकिंग ॲप्सविरोधात कारवाई तसेच प्रवाशांच्या तक्रारींचे प्रभावी निराकरण याबाबत सविस्तर अहवाल सादर करणार आहे. समितीचा अहवाल प्राप्त होताच पुढील बैठकीत तातडीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाईल, असे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.
“प्रवाशांची आर्थिक लूट कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहतूकदारांवर कठोर कारवाई करण्यात येईल,” असा इशाराही सरनाईक यांनी दिला.
बसस्थानकांमध्ये मराठी भाषेची काटेकोर अंमलबजावणी
राज्यातील बसस्थानकांवरील संपर्क व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या. प्रत्येक बसस्थानकावर प्रवासी तक्रार आणि मदतीसाठी संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच बदललेल्या गावांच्या नावांबाबत आणि व्याकरणदृष्ट्या अचूक मराठी भाषेच्या वापराबाबत परिवहन विभागाने परिपत्रक काढून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेशही सरनाईक यांनी दिले.
१ जूनपासून एसटी स्थानकांवरील स्वच्छतागृहे मोफत
एसटी बस आणि बसस्थानकांच्या अस्वच्छतेबाबत वारंवार येणाऱ्या तक्रारींची दखल घेत राज्य सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या १ जूनपासून राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांवरील स्वच्छतागृहे प्रवाशांसाठी मोफत करण्यात येणार असल्याची घोषणा प्रताप सरनाईक यांनी केली. बसस्थानकांचा कायापालट, स्वच्छता आणि प्रवाशांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठोस उपाययोजना राबवल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, अतिरिक्त परिवहन आयुक्त भरत कळसकर तसेच ‘सुराज्य अभियान’चे अभिषेक मुरुकटे, अरविंद पानसरे आणि सुनील हनवट उपस्थित होते.

