( मुंबई )
राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्ध व्हावीत यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. येत्या खरीप हंगाम 2026 पासून बियाण्यांची डीएनए फिंगरप्रिंट टेस्ट अनिवार्य करण्यात येणार असल्याची घोषणा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली. बनावट किंवा निकृष्ट बियाणे विक्री करणाऱ्या उत्पादक आणि विक्रेत्यांवर बियाणे कायदा आणि बियाणे नियंत्रण आदेशांनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
‘साथी’ पोर्टलमुळे बियाण्यांचा डिजिटल मागोवा
बियाण्यांच्या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी ‘साथी’ पोर्टलचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. या पोर्टलच्या माध्यमातून बियाणे उत्पादकांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत प्रत्येक टप्प्यावर बियाण्यांची नोंद डिजिटल साखळी (ट्रेसिबिलिटी) स्वरूपात केली जाणार आहे. यामुळे बनावट बियाण्यांवर नियंत्रण ठेवणे अधिक सोपे होणार आहे. “शेतकरी हित हेच सर्वोच्च प्राधान्य आहे,” असे दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले.
पुण्यातील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या डॉ. शिरनामे सभागृहात बियाणे उत्पादक संस्था आणि विक्रेत्यांसाठी खरीपपूर्व राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.या कार्यशाळेत आगामी हंगामासाठी पूर्वतयारी, बियाण्यांचे नियोजन, उपलब्धता आणि वितरण यावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, कृषी आयुक्त सुरज मांढरे, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद महासंचालक राहुल रंजन महिवाल, संचालक रफिक नाईकवाडी, सुनिल बोरकर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
एल निनो पार्श्वभूमीवर विशेष सूचना
यंदा संभाव्य एल निनो परिस्थिती लक्षात घेता, कमी पाण्यात तग धरणारे आणि कमी कालावधीत वाढणारे वाण उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच, जिल्हानिहाय पीक नियोजन मजबूत करण्यासोबतच उशिरा पेरणी झाल्यास पर्यायी पीक नियोजन तयार ठेवण्याचे निर्देशही कृषी विभागाला देण्यात आले.
गुणवत्तापूर्ण बियाण्यांमुळे शेती उत्पादनात साधारणतः 15 ते 20 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते, हे अधोरेखित करत शंभर टक्के प्रमाणित बियाण्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले. खरीप 2026 साठी राज्यात सुमारे 145.20 लाख हेक्टर पेरणी क्षेत्र अपेक्षित आहे. त्यानुसार बियाण्यांची एकूण गरज 20.16 लाख क्विंटल इतकी निश्चित करण्यात आली आहे. सध्या राज्यात सुमारे 28.14 लाख क्विंटल बियाणे उपलब्ध असून, हा साठा गरजेच्या सुमारे 140 टक्के आहे. त्यामुळे बियाण्यांच्या उपलब्धतेबाबत कोणतीही अडचण नसल्याचे दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांसाठी दिलासा, बनावट बियाण्यांना लगाम
डीएनए फिंगरप्रिंट टेस्ट आणि डिजिटल ट्रॅकिंग प्रणालीमुळे बनावट बियाण्यांवर मोठा आळा बसणार असून, शेतकऱ्यांना खात्रीशीर आणि गुणवत्तापूर्ण बियाणे मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या निर्णयामुळे आगामी खरीप हंगामात उत्पादनवाढीस चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

