(संगमेश्वर)
तालुक्यातील माळवाशी गावचे सुपुत्र आणि मुंबई पोलिस दलात सहायक पोलिस उपनिरीक्षक म्हणून सेवा बजावणारे दिलीप कडू यांचा नुकताच मुंबईत गौरव करण्यात आला. त्यांच्या ३३ वर्षांच्या उल्लेखनीय पोलिस सेवेला मान्यता देत मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. हा सत्कार वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स डोम येथे आयोजित कार्यक्रमात झाला.
दिलीप कडू यांनी १९९२ मध्ये राज्य राखीव पोलिस दलात कॉन्स्टेबल म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त भागात तीनवेळा कर्तव्य बजावणाऱ्या कडू यांची २००३ मध्ये मुंबई पोलिस दलात बदली झाली. त्यानंतर त्यांनी राईट कंट्रोल, सशस्त्र पोलीस, प्रोटेक्शन युनिट, पंतनगर व विक्रोळी पोलीस ठाणे तसेच स्पेशल ब्रँच सीआयडीमध्ये जबाबदारी पार पाडत उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून त्यांना आतापर्यंत एकूण ८६ बक्षिसे प्राप्त झाली आहेत.
केवळ पोलिस खात्यातच नव्हे, तर आपल्या मूळ गावीही कडू यांचे योगदान लक्षणीय आहे. माळवाशी व परिसरात सामाजिक, क्रीडा आणि शैक्षणिक उपक्रमांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. गावातील धार्मिक, सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमांमध्ये त्यांच्या पुढाकारामुळे चैतन्य निर्माण झाले आहे. गावातील युवकांसाठी व्यासपीठ निर्माण व्हावे, यासाठी त्यांनी अनेक क्रीडा मंडळांची स्थापना केली. दरवर्षी विविध स्पर्धांचे आयोजन करून ग्रामीण भागातील युवकांना संधी उपलब्ध करून दिली. मुंबईतील माळवाशीतील चाकरमान्यांशी समन्वय साधून गावच्या विकासातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. माळवाशी परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शहराकडे जावे लागत होते. ही अडचण लक्षात घेऊन त्यांनी गावात हायस्कूल सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सहकार्याने हे स्वप्न साकार झाले. त्यामुळे अनेक गरीब मुलांना गावातच शिक्षण घेण्याची संधी मिळाली. दिलीप कडू यांचे सामाजिक भान आणि योगदान पाहता, माळवाशी पंचक्रोशीतूनही त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पोलिस सेवा आणि समाजकार्य यांचे उत्तम उदाहरण ठरलेले कडू हे आजही गावातील तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.