( वैभववाडी )
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात करुळ-जामदारवाडी येथील धरणात आंघोळीसाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज (बुधवारी) संध्याकाळी साडेचार च्या दरम्यान घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, करुळ-जामदारवाडी येथील धरणावर अंघोळीसाठी म्हणून एकूण पाच जण गेले होते. त्यातील तिघींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर दोघांना वाचवण्यात यश आले. या तीनही शाळकरी मुली असून दोघी करूळ भोयडेवाडी येथील तर एक कुसूर येथील आहे. या घटनेची माहिती मिळताच करुळ येथील धरणावर नागरिकांनी मोठी गर्दी केली. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तिघी खोल पाण्यात गेल्या आणि बुडाल्या. त्यांच्या सोबत उपस्थित असलेल्या इतरांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो निष्फळ ठरला.
या दुर्घटनेत तन्वी अनंत माळकर (वय १६), स्वरा संदीप सुर्वे आणि ऋतिका संतोष पाटील (वय १८) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी तातडीने वैभववाडी येथे भेट देत परिस्थितीची पाहणी केली. विभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव यांनीही ग्रामीण रुग्णालयात जाऊन माहिती घेतली. पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मृत मुलींचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. दुर्घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि ग्रामस्थांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. या घटनेमुळे करुळ परिसरासह संपूर्ण वैभववाडी तालुक्यात शोक व्यक्त करण्यात येत आहे.

