(मुंबई)
महाराष्ट्र शासनाने प्रशासनात मोठे फेरबदल करत गेल्या 15 दिवसांत एकूण 46 सनदी (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये अनेक वरिष्ठ आणि महत्त्वाच्या पदांवरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मंगळवारी (7 एप्रिल) पुन्हा 11 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले असून राज्यातील प्रशासनिक हालचालींना वेग आला आहे. यापूर्वी 31 मार्च रोजी 10 अधिकाऱ्यांच्या आणि 2 एप्रिल रोजी 25 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा नव्या आदेशांमुळे एकूण बदल्यांची संख्या 46 वर पोहोचली आहे.
महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना नव्या जबाबदाऱ्या
नवीन आदेशानुसार, राहुल रंजन महिवाल यांची सदस्य सचिव, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे येथे बदली करण्यात आली आहे. श्वेता सिंघल यांची विशेष निवासी आयुक्त, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे नियुक्ती करण्यात आली आहे. लक्ष्मण राऊत यांना मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. रुचेश जयवंशी यांची महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ, पुणे येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे.
ऊर्जा, पाणी व नियोजन विभागात बदल
कन्हुराज बागटे यांची सह-व्यवस्थापकीय संचालक, Maharashtra State Electricity Distribution Company Limited (महावितरण), कल्याण येथे बदली झाली आहे. डॉ. दिलीप जगदाळे यांची पाणी पुरवठा व स्वच्छता विभागात सह-सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे, तर गीतांजली बाविस्कर यांना नियोजन विभाग, मंत्रालयात सह-सचिव पदावर बदली देण्यात आली आहे.
जिल्हा पातळीवरील महत्त्वाचे बदल
मिनल करणवाल यांची जिल्हा परिषद, जळगाव येथून प्रकल्प संचालक, Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp (POCRA), मुंबई येथे बदली झाली आहे. करिश्मा नायर यांना नाशिक महानगरपालिकेतून जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त करण्यात आले आहे. अमित रंजन यांची अतिरिक्त आयुक्त, नाशिक महानगरपालिका म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या सततच्या बदल्यांमुळे राज्यातील प्रशासनिक यंत्रणेत मोठे बदल होत असून विविध विभागांमध्ये नव्या धोरणांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

