(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
कोकणात वाढलेल्या पर्यटकांच्या गर्दीमुळे इंधनटंचाईचे पडसाद आता अधिक तीव्रपणे उमटू लागले असून रत्नागिरी एमआयडीसी परिसरातील सीएनजी पंपावर सोमवारी रात्री उशिरापर्यंत वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. स्थानिक वाहनचालकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागल्याने अखेर संतप्त नागरिकांनी पंप प्रशासनाला जाब विचारत तीव्र नाराजी व्यक्त केली.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरापर्यंत चारचाकी वाहनांच्या रांगा पंपाबाहेर मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचल्या होत्या. पर्यटकांच्या वाहनांसह स्थानिक वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागताच स्थानिकांनी पंप प्रशासनाकडे स्थानिक वाहनांसाठी स्वतंत्र रांग करण्याची मागणी केली. मात्र, पंपावरील मुख्य कर्मचाऱ्याने या मागणीकडे गांभीर्याने न पाहता उडवाउडवीची भूमिका घेतल्याचा आरोप स्थानिकांनी केला. त्यामुळे संतप्त नागरिकांनी थेट कर्मचाऱ्यालाच जाब विचारत नाराजी व्यक्त केली. वाढता तणाव लक्षात घेता काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी केली. त्यांनी पंप प्रशासनाला सुनावत स्थानिक वाहनांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्यानंतर अखेर स्वतंत्र रांग सुरू करण्यात आली. त्यानंतर परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात आली.
दरम्यान, मे महिन्यातील पर्यटन हंगाम, चाकरमान्यांची वाढती वर्दळ आणि मर्यादित इंधनसाठा यामुळे कोकणातील सीएनजी, पेट्रोल आणि डिझेल पंपांवर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. नियोजनाच्या अभावामुळे सामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याची भावना वाहनचालकांसह स्थानिकांमधून व्यक्त होत असून जिल्हा प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून इंधन व्यवस्थापन अधिक सक्षम करावे, अशी मागणी जोर धरत आहे.

