( मुंबई )
कोल्हापूरच्या शाही दसऱ्यानंतर आता तुळजापुरातील तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्रोत्सव महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवांमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. राज्य पर्यटन विभागाने सोमवारी यासंदर्भातील परिपत्रक जारी केले. यानुसार यंदाच्या नवरात्रोत्सवात घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांची भव्य मेजवानी होणार आहे.
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री तुळजाभवानी देवीच्या प्राचीन मंदिरात दरवर्षी जवळपास ५० लाख भाविक दर्शनासाठी येतात. नवरात्र महोत्सवाच्या काळात गोंधळी गीत, भजन, नृत्य, शास्त्रीय तसेच लोकसंगीताच्या कार्यक्रमांत महाराष्ट्र आणि देशभरातील नामवंत कलाकार सहभागी होतात. पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी या महोत्सवाला ‘प्रमुख महोत्सव’ दर्जा देण्यात आला आहे.
३०० ड्रोनद्वारे नवरात्र थीम लाईट शो
यंदा धार्मिक विधींबरोबरच प्रबोधनपर कार्यक्रम, भव्य लोकसंगीत मैफिली, ३०० ड्रोनद्वारे नवरात्र थीम लाईट शो, चित्रकला प्रदर्शन, व्याख्याने, मॅरेथॉन, फॅम टूर्स आणि पर्यटन विषयक मेळाव्यांचे आयोजन केले जाणार आहे. म्हैसूरच्या दसऱ्याप्रमाणेच तुळजापुरातील कार्यक्रमांची प्रसिद्धी मराठीबरोबर इंग्रजीतही करण्याचे नियोजन आहे, ज्यामुळे देश-विदेशातील पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होईल.
यूट्यूबवर थेट प्रक्षेपण
स्थानिक लोककला आणि लोकनृत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अंबाबाईचे गोंधळी गीत, भारुड, जाखडी, भजन-कीर्तन स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या संकेतस्थळावर व अधिकृत यूट्यूब चॅनेलवर यांचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.

