(नाशिक)
राज्यात नुकतेच दहावी आणि बारावी परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून, दहावीनंतर अनेक विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली होती. तर बारावीची परीक्षा पूर्ण झाल्यानंतर हजारो विद्यार्थ्यांनी डॉक्टर होण्याचे स्वप्न डोळ्यांसमोर ठेवत नीट परीक्षा दिली होती. मात्र, परीक्षा होऊन अवघे दहा दिवसही उलटले नसताना केंद्र सरकारने ३ मे २०२६ रोजी घेण्यात आलेली राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला. पेपरफुटी प्रकरण समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे.
देशातील सुमारे २२ लाख विद्यार्थ्यांनी यंदा ३ मे २०२६ रोजी नीटची परीक्षा दिली होती. त्यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. मात्र, देशभरात ४२ तास अगोदरच या पेपरची प्रश्नपत्रिका बाहेर आल्याने पेपर फुटला होता. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेकडून नीट परीक्षा निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) पेपरफुटी प्रकरणात आता नाशिक कनेक्शन समोर आलं आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील शुभम खैरनार याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतल्याने प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. ओळख लपवण्यासाठी त्याने चक्क टक्कल केले होते. मात्र नाशिक पोलिसांच्या नजरेतून तो सुटला नाही. दरम्यान, शुभम खैरनारचे वडील डॉ. मधुकर खैरनार यांनी आपल्या मुलाचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचा दावा केला आहे. “माझा मुलगा गेल्या सहा महिन्यांपासून नाशिकमध्ये बीएएमएसची प्रॅक्टिस करत आहे. तो निर्दोष आहे. पोलीसांनी निष्पक्ष चौकशी करावी,” अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांसमोर दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या ३० वर्षीय संशयिताने नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका १० लाख रुपयांना खरेदी केली होती. त्यानंतर अधिक नफा मिळवण्यासाठी त्याने हीच प्रश्नपत्रिका हरियाणातील एका डॉक्टरला १५ लाख रुपयांना विकली. या व्यवहारातून त्याने अवघ्या काही वेळात ५ लाखांची कमाई केल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
पेपरफुटीच्या आरोपांनंतर राष्ट्रीय परीक्षा संस्था कडून नीट परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानं देशभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. दोन-दोन वर्षे मेहनत घेऊन तयारी केलेल्या विद्यार्थ्यांना आता पुन्हा परीक्षेला सामोरं जावं लागणार असल्याने मानसिक ताण वाढला आहे. “आम्ही दिवस-रात्र मेहनत करून तयारी केली होती. पण आता पुन्हा नव्याने परीक्षा द्यावी लागणार असल्याने मोठा मानसिक ताण निर्माण झाला आहे. परीक्षा केंद्रांवर कडक नियम असतानाही पेपर बाहेर कसा गेला, हा मोठा प्रश्न आहे. संपूर्ण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला आहे.” अशी जळजळीत आणि संतप्त भावना विद्यार्थी व्यक्त करत आहेत.
विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा विचार करा – शिक्षण तज्ज्ञांची मागणी
3 मे रोजी झालेली NEET परीक्षा रद्द करून पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय लाखो विद्यार्थ्यांसाठी मानसिक धक्का आहे. अनेक विद्यार्थ्यांनी गेली दोन-तीन वर्षे कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि आर्थिक त्याग करून तयारी केली होती. गैरप्रकारांच्या संशयामुळे संपूर्ण प्रक्रिया पुन्हा राबवावी लागणं अत्यंत वेदनादायी आहे. स्पर्धा परीक्षांवरील विश्वास टिकवण्यासाठी पारदर्शक आणि काटेकोर यंत्रणा उभी करणं अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, आत्मविश्वास आणि भवितव्य लक्षात घेऊन शासन आणि परीक्षा यंत्रणेनं अधिक जबाबदारीनं निर्णय घेण्याची गरज आहे, असे शिक्षण तज्ज्ञांनी म्हटले आहे.
NEET पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात संताप
NEET पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. सोशल मीडियावरही परीक्षा व्यवस्थापन आणि सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, पारदर्शक चौकशीची मागणी जोर धरत आहे.
३ मे २०२६ रोजी झालेली नीट परीक्षा रद्द करण्यात आली असून, आता नव्या परीक्षेची तारीख लवकरच जाहीर होईल, असे सांगण्यात आले. परीक्षार्थींचे परीक्षा केंद्र ३ मे रोजीचेच राहणार असून विद्यार्थ्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांकडून नव्या परीक्षेसाठी शुल्क घेतले जाणार नाही. नव्या परीक्षेसाठी नवे ओळखपत्र दिले जाणार आहेत. विद्यार्थी, पालकांनी फक्त एनटीएच्या सूचनांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन केंद्राकडून करण्यात आले.

