(ठाणे)
नाशिक-मुंबई महामार्गावर वाहनं अडवून अग्निशस्त्रांच्या धाकावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या झारखंडमधील एका नक्षलवाद्यासह सहा जणांना ठाणे शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे अशी आहेत – राजेंद्र महेश यादव (27, झारखंड), मोहम्मद सरफराज अब्दुल सत्तार अन्सारी (36), अब्दुल रहीम सलीम अन्सारी (30), सद्दाम अबुल अन्सारी (30), शिवकुमार चौथा उराव (40) आणि अरविंद बाबूराव यादव (21). त्यांच्याकडून चारचाकीसह 03 अग्निशस्त्रं, 04 जिवंत काडतुसं, 01 लोखंडी कोयता, 01 लोखंडी कटावणी, मिरची पूड, रस्सी तसेच 06 मोबाईल फोन, असा सुमारे 8 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
डोळ्यात मिरची पूड टाकून लुटण्याची तयारी
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, खारेगाव टोल नाक्याजवळ संशयास्पद चारचाकीत सहा जण वाहनांना थांबवून शस्त्रांच्या धाकावर आणि डोळ्यात मिरची पूड फेकून लुटण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलीस हवालदार संदीप भागरे यांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली १४ ऑक्टोबर रोजी साडेसहा वाजता सापळा रचून या टोळीला पकडण्यात आले.
या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१०(४), (६), तसेच शस्त्रास्त्र कायदा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एकूण ७ लाख ९६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नक्षलवादीचा झारखंडमध्ये गुन्हा दाखल
अटक करण्यात आलेल्या राजेंद्र यादव या नक्षलवाद्यावर झारखंडमध्ये गंभीर गुन्हा दाखल आहे, तर इतर आरोपींवर वाहनचोरी आणि मारामारीचे गुन्हे नोंदले आहेत. महाराष्ट्रात या सर्वांवर आतापर्यंत कोणताही गुन्हा नोंदलेला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

