( नाशिक )
टीसीएसमधील बहुचर्चित लैंगिक अत्याचार आणि कथित धर्मांतरण प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिला नाशिकरोड न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दोन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार असलेल्या निदा खानला अलीकडेच छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर तिला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तिची रवानगी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात करण्याचे आदेश दिले.
नाशिक पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या मदतीने संयुक्त कारवाई करत निदा खानला अटक केली होती. अटकेनंतर तिला नाशिकरोड न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. सोमवारी पोलीस कोठडी संपल्यानंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश केदार जोशी यांच्या न्यायालयात तिला पुन्हा हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर केली.
या प्रकरणात सरकारी पक्ष आणि बचाव पक्षात जोरदार युक्तिवाद झाला. विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी सरकारची बाजू मांडली. तपासादरम्यान एसआयटी पथकाने निदा खान आणि तिच्या कुटुंबीयांची समोरासमोर चौकशी केली. फरार असताना तिला कोणी आश्रय दिला, तसेच कथित धर्मांतरण प्रकरणाचे धागेदोरे नेमके कुठे जोडलेले आहेत, याचा तपास पोलिसांनी केला. चौकशीत काही महत्त्वाचे दुवे हाती लागल्याचा दावा तपास यंत्रणेकडून करण्यात आला आहे.
निदा खानच्या वतीने अॅड. कासलीवाल यांनी बाजू मांडली. दरम्यान, आरोपी गर्भवती असल्याने तिच्या आरोग्याची आणि सुरक्षेची विशेष काळजी घेण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे नाशिकसह राज्यभरात मोठी चर्चा रंगली असून तपास यंत्रणा आता या प्रकरणातील इतर धागेदोरे आणि संभाव्य संबंधांचा शोध घेत आहे

