(चिपळूण / प्रतिनिधी)
तालुक्यातील कळवंडे माठवाडी येथील नऊ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ६५ वर्षीय वृद्धाचा मृतदेह स्थानिक डोंगराळ भागातील काजूच्या बागेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
लक्ष्मण बाबु हुमणे (वय ६५, रा. कळवंडे माठवाडी, ता. चिपळूण) हे १ मे रोजी सकाळी दहाच्या सुमारास घरातून कोणालाही काहीही न सांगता बाहेर पडले होते. बराच वेळ उलटल्यानंतरही ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला होता. नातेवाईकांसह ग्रामस्थांनी परिसरात शोधमोहीम राबवली; मात्र त्यांचा कोणताही मागमूस लागत नव्हता. दरम्यान, शनिवारी सकाळी कळवंडे येथील ‘बारकोंबळा’ नावाच्या डोंगराळ भागातील एका काजूच्या बागेत त्यांचा मृतदेह आढळून आला.
या घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. १ मे ते ९ मे या कालावधीत त्यांचा मृत्यू नेमका कधी आणि कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. लक्ष्मण हुमणे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून चिपळूण पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू असून उत्तरीय अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

