( चिपळूण )
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित ‘आराही – सायबर सुरक्षित नारी, डिजिटल सक्षम नारी’ या राज्यस्तरीय जनजागृती कार्यक्रमात चर्चासत्रात मानसोपचार तज्ञ डॉ. अतुल ढगे यांनी सायबर सुरक्षेच्या मानसिक पैलूंवर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
डॉ. ढगे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, सायबर गुन्हे हे केवळ तांत्रिक नसून ते मानवी मानसशास्त्राचा फायदा घेऊन केले जातात. गुन्हेगार लोकांच्या लोभ, भीती आणि अतिउत्साह या भावनांचा वापर करून फसवणूक करतात. त्यामुळे सायबर सुरक्षिततेसाठी केवळ मजबूत पासवर्ड पुरेसा नसून मजबूत मानसिकता असणेही तितकेच आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
अशा घटनांनंतर अनेक व्यक्तींमध्ये भीती, चिंता, असुरक्षितता आणि एकटेपणा वाढतो. काही प्रकरणांमध्ये हे पुढे जाऊन नैराश्य (depression) किंवा भीतीचे झटके (panic attacks) यांसारख्या मानसिक आजारांमध्ये परिवर्तित होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.
“सायबर गुन्हे मोबाईलमध्ये सुरू होतात, पण त्याचा परिणाम मनावर होतो,” असे सांगत डॉ. ढगे यांनी मानसिक जागरूकता आणि भावनांवर नियंत्रण यावर भर दिला. “Prevention is better than cure” या तत्त्वावर आधारित राहून, लोकांनी सावध, सजग आणि मानसिकदृष्ट्या मजबूत राहणे हीच खरी सायबर सुरक्षिततेची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ कांचन मदार यांच्या संकल्पनेतून आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र आणि रत्नागिरी जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आराही सायबर सुरक्षित नारी, डिजिटल सक्षम नारी’ हा राज्यस्तरीय जनजागृती व सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सायबर सुरक्षा जनजागृती, महाराष्ट्र महिला डॉक्टर राज्यस्तरीय हेल्पलाईनचा शुभारंभ, ‘आराही नारी गौरव पुरस्कार’ प्रदान तसेच विशेष सांस्कृतिक सादरीकरण आणि ‘डिजिटल जागर’ जनजागृती कार्यक्रम पार पडले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठले, आयएमए अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी, सहसचिव डॉ. उज्ज्वला बर्वेकर, विविध पत्रकार यांचा सत्कार करन्यात आला तथा विविध क्षेत्रात आपले कार्याने छाप सोडणाऱ्या पत्रकार अनया निकम, सीमाताई चाळके, संगीता लोठे, रंजीता चॅरिटेबल ट्रस्टच्या रंजिता ओतारी, दीपली सावंत-देसाई आणि नगरसेविका राणी महाडिक यांचा ‘आराही नारी गौरव पुरस्काराने’ सन्मान करणायात आला.
या प्रसंगी सायबर तज्ज्ञ धनंजय देशपांडे, अधिकारी, तसेच नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले, पोलीस निरीक्षक फुलचंद मंगडे, उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, मुख्याधिकारी संजय जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव, नगरसेविका यांच्यासह आयएमएचे पदाधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी सायबर सुरक्षेवर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या चर्चासत्रात डॉ. विपिन चव्हाण, पोलीस अधिकारी स्मिता सुतार, डॉ. अतुल ढगे, पत्रकार सतीश कदम, डॉ. विकास कुबरे, अॅड. अनुपमा ठाकूर, अमोल तारी, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले व सायबर तज्ज्ञ धनंजय देशपांडे यांनी सहभाग घेतला. पॅनल समन्वयक म्हणून डॉ. निलेश नाफडे व डॉ. कांचन मदार यांनी काम पाहिले.
कार्यक्रमात संजीवनी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी ‘मायाजाल’ हे सायबर जनजागृतीपर सादरीकरण केले, तर छावा इंस्टिट्यूटने नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीद खेरकर यांनी केले.

