(खेड)
तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहत आज (रविवारी, दि. १८) रोजी मोठ्या दुर्घटनांनी हादरली. एका बाजूला ‘लासा सुपरजेनेरिक’ या कारखान्याला भीषण आग लागली असतानाच, दुसऱ्या बाजूला महामार्गाच्या पश्चिमेकडील ‘ॲक्विला ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीतील रिऍक्टरचा स्फोट होऊन दोन कामगार गंभीररित्या भाजले. स्फोट दुपारी सुमारे पावणेतीन वाजता झाला.
लोटे एमआयडीसी ही वायूगळती, सांडपाण्याचे प्रदूषण, व वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे कायमच चर्चेत राहिलेली औद्योगिक वसाहत आहे. रविवारी घडलेल्या या दोन दुर्घटनांनी या वसाहतीतील सुरक्षेच्या हलगर्जीपणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
स्फोटानंतर ॲक्विला ऑरगॅनिकमध्ये गंभीर जखमी झालेल्या कामगारांना रुग्णवाहिकेच्या अभावामुळे दुचाकीवरून रुग्णालयात हलवण्यात आले. व्यवस्थापनाकडून कोणतीही तत्काळ मदत न मिळाल्यामुळे स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अशा आपत्कालीन प्रसंगी व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांची चारचाकीही वापरली गेली नाही, ही बाब संतापजनक असल्याची चर्चा घटनास्थळी होती.
ज्यांच्या मेहनतीवर उद्योग चालतो, अशा कामगारांबाबत कारखान्याच्या व्यवस्थापनाने दाखवलेली बेफिकिरी अत्यंत निषेधार्ह आहे. अशा व्यवस्थापनाला जाब कोण विचारणार? असा सवाल आता पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित करत आहेत.
या दुर्घटनांमुळे लोटे औद्योगिक वसाहतीमधील सुरक्षेच्या उपाययोजनांची फेरतपासणी होण्याची गरज अधोरेखित झाली आहे.