(नवी दिल्ली)
भारतातील डिजिटल पेमेंट व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला आहे. National Payments Corporation of India (NPCI) ने UPI Collect ही सुविधा सामान्य ऑनलाईन व्यवहारांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी नुकतीच सुरू झाली आहे.
आतापर्यंत ऑनलाईन शॉपिंग किंवा एखाद्या वेबसाईटवर पेमेंट करताना ग्राहकांना UPI ID किंवा मोबाईल नंबर मॅन्युअली टाईप करावा लागत होता. मात्र आता बहुतांश व्यवहारांसाठी ही पद्धत बंद करण्यात आली असून ग्राहकांना अधिक सुरक्षित आणि जलद पर्याय वापरावे लागतील.
काय होती ‘UPI Collect’ सुविधा?
जेव्हा ग्राहक एखाद्या वेबसाईटवर आपला UPI ID (उदा. abc@okaxis) टाकत होता, तेव्हा त्या वेबसाईटकडून ग्राहकाच्या UPI ॲपवर पैसे देण्याची ‘रिक्वेस्ट’ पाठवली जात असे. या प्रक्रियेला UPI Collect असे म्हटले जात होते. मात्र, अनेक वेळा चुकीचा UPI ID टाईप होणे, फिशिंग लिंक किंवा बनावट रिक्वेस्टमुळे ग्राहकांची फसवणूक होण्याचे प्रकार वाढले होते. त्यामुळे डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी NPCI ने हा निर्णय घेतला आहे.
आता पेमेंट कसे कराल?
नवीन प्रणालीमध्ये ऑनलाईन पेमेंट करताना ग्राहकांना मुख्यतः दोन पर्याय उपलब्ध असतील.
1. ॲप आयकॉनद्वारे पेमेंट
पेमेंट पेजवर थेट Google Pay, PhonePe किंवा Paytm सारख्या ॲप्सचे आयकॉन दिसतील. त्यावर क्लिक करताच संबंधित ॲप उघडेल आणि काही सेकंदांत व्यवहार पूर्ण करता येईल.
2. QR कोड स्कॅन करून पेमेंट
स्क्रीनवर डायनॅमिक QR कोड दिसेल. तो स्कॅन करून ग्राहक थेट UPI ॲपमधून पेमेंट करू शकतील.
यामुळे मोबाईल नंबर किंवा UPI ID टाईप करण्याची गरज कमी होईल आणि चुकीचे व्यवहार होण्याची शक्यता घटेल.
या 4 ठिकाणी जुनी पद्धत सुरूच राहणार
नवीन बदल लागू झाल्यानंतरही काही ठिकाणी UPI ID मॅन्युअली टाकण्याची जुनी पद्धत सुरू राहणार आहे.
- शेअर बाजार आणि IPO अर्ज: गुंतवणूक किंवा IPO साठी अर्ज करताना UPI ID टाकावा लागेल.
- Apple (iOS) वापरकर्ते: आयफोन किंवा आयपॅडवर ब्राऊझरमधून पेमेंट करताना जुनी पद्धत वापरावी लागेल.
- आंतरराष्ट्रीय व्यवहार: परदेशी वेबसाईट्स किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांना पेमेंट करताना.
- ऑटो-डेबिट व्यवस्थापन: आधी सुरू असलेले ऑटो-पेमेंट बदलण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी.
डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न
या बदलामुळे मानवी चुका, चुकीचे UPI ID आणि फिशिंग फसवणूक कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच QR कोड आणि थेट ॲप-आधारित पेमेंटमुळे व्यवहार अधिक जलद आणि सुरक्षित होतील, असा दावा NPCI कडून करण्यात आला आहे.

