( गणपतीपुळे / वैभव पवार )
रत्नागिरी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात चार महिलांवरील अत्यंत गुंतागुंतीच्या थायरॉईड शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यात आल्या. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. डॉ. उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य समितीच्यावतीने संबंधित आरोग्य टीमचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
या यशस्वी शस्त्रक्रियेमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, नाक-कान-घसा तज्ञ डॉ. सुनीता बागे, भूलतज्ञ डॉ. जमीर शेख व डॉ. प्रियांका साळुंखे यांच्यासह परिसेविका सुमन कोलपते आणि भावना कुलकर्णी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच वैद्यकीय अधीक्षक व स्त्रीरोग तज्ञ डॉ. विनोद सांगवीकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण आरोग्य यंत्रणेने समन्वयाने कार्य केले.
यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सल्लागार व सनियंत्रण समितीच्या सदस्य सौ. श्रद्धा मोरे, सौ. हर्षदा गावडे, श्री. सोहेल मुकादम आणि श्री. सागर भिंगारे यांनी आरोग्य टीमचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
जिल्हा रुग्णालयात अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडत असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे.

