(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्याला आज पुन्हा एकदा निसर्गाच्या रौद्र रूपाचा सामना करावा लागला. सकाळपासून कडक उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असतानाच दुपारनंतर अचानक वातावरणात मोठा बदल झाला आणि अवघ्या काही क्षणांत आभाळ दाटून आले. दुपारी साडेतीनच्या सुमारास दिवसाढवळ्या काळोख पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
यानंतर विजांचा प्रचंड कडकडाट, डोळे दिपवणारा लखलखाट आणि मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. सलग तिसऱ्या दिवशी झालेल्या या अवकाळी पावसाने संगमेश्वरकरांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर इतका प्रचंड होता की काही मिनिटांतच रस्त्यांवर पाण्याचे लोंढे वाहू लागले. अनेक रस्त्यांना नाले आणि गटारांचे स्वरूप प्राप्त झाले होते.
या पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालक आणि पादचारी यांची मोठी तारांबळ उडाली. काही ठिकाणी वाहनांची वाहतूक मंदावली, तर नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घेण्यासाठी धावाधाव केली.
दरम्यान, मुसळधार पावसासोबत सुटलेल्या सुसाट वाऱ्यानेही भीतीचे वातावरण निर्माण केले. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की झाडांच्या फांद्या तुटून पडण्याच्या घटना घडल्या. सुरक्षेच्या कारणास्तव अनेक भागांतील वीजपुरवठा तातडीने खंडित करण्यात आल्याने परिसर काही काळ अंधारात बुडाला होता.
गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही अवकाळी पावसाचा फटका बसत असल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हा अवकाळी पाऊस आहे की मान्सूनपूर्व धडक, याबाबत चर्चा सुरू असली तरी निसर्गाच्या या तांडवाने संगमेश्वरकरांची चांगलीच दाणादाण उडवली आहे.

