( रत्नागिरी )
उद्धव ठाकरे यांच्या प्रचार सभांना 5 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. पहिलीच सभा रत्नागिरी येथे होणार आहे. कोकणातील दोन्ही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाल्यामुळे आता ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मंगळवारी (ता. ५) प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. कोल्हापूर येथे महालक्ष्मीचे दर्शन घेऊन ते प्रचाराचा प्रारंभ करतील. सायंकाळी सहा वाजता रत्नागिरीतील जलतरण तलावाजवळ शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील. रत्नागिरी जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असला, तरी लोकसभा निवडणुकीत कोकणातील दोन्ही मतदारसंघांतून महायुतीचे उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे विधानसभेसाठी उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली आहे. १७ नोव्हेंबरला मुंबईमध्ये त्यांची सांगता सभा होईल. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाकडून माजी आमदार बाळ माने यांना उमेदवारी दिली आहे.
शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांच्यासोबत त्यांची लढत होईल. त्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याकडे आणि भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या सभेची जय्यत तयारी सुरू असून सभेस येणाऱ्या गर्दीला कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही, अशा पद्धतीने नियोजन करण्यात येत आहे. मात्र या सभेतून उद्धव ठाकरे हे उदय सामंत यांच्यावर जोरदार निशाणा साधण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ठाकरे यांचे भाषणात मुद्दे काय असणार सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.