( गणपतीपुळे / वैभव पवार )
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गावात सध्या मोकाट गुरांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट वाढला आहे. या मोकाट गुरांमुळे संपूर्ण मालगुंड परिसरातील शेतकऱ्यांच्या भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतकरी हैराण झाले आहेत.सध्या मालगुंड परिसरात मोकाट गुरे ठिकठिकाणी फिरत असल्याचे चित्र दिसून येते. मात्र संबंधित मोकाट गुरांच्या मालकांकडून आपली गुरे शोधण्यासाठी कुठलेही प्रयत्न केले जात नसल्याने सध्या आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र याचा मोठा फटका आणि नाहक त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.
मालगुंड परिसरातील भंडारवाडा, रहाटागर व नजीकच्या अन्य परिसरातील स्थानिक शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने आणि कष्टाने भात शेती पिकवली आहे. मात्र ही भातशेती पिकण्याच्या अंतिम टप्प्यात आलेली असताना मोकाट गुरांकडून मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान केले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत माहिती देताना मालगुंड भंडारवाडा येथील शेतकरी सुनील उर्फ बादशाह पाटील यांनी सांगितले की, ही मोकाट गुरे मोठ्या प्रमाणात दिवसा व रात्री भटकत असतात. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत असून या गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्हाला दिवस रात्र पहारा द्यावा लागतो. तसेच या मोकाट गुरांना बाजूला करण्यासाठी कायम लक्ष ठेवून राहावे लागत असल्याने याबाबत संबंधित मोकाट गुरांचे मालक आणि स्थानिक ग्रामपंचायत लक्ष कधी देणार? असा प्रश्न त्यांनी केला आहे. याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यासाठी आणि मोकाट गुरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मालगुंड ग्रामपंचायतीने गांभीर्याने आणि कटाक्षाने लक्ष घालावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
वाहनचालकांनाही मोकाट गुरांचा त्रास
दरम्यान, मालगुंड गावात ठिकठिकाणी मोकाट गुरांचा सुळसुळाट वाढला असून ही मोकाट गुरे मालगुंड बाजारपेठेतील मुख्य मार्गावर ठाण मांडून बसल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे या मोकाट गुरांचा त्रास लहान मोठ्या सर्वच वाहन चालकांना होत असून एखादा अपघाताचा मोठा प्रकार घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. ही मोकाट गुरे मालगुंड बाजारपेठेत ठाण मांडून बसलेली, तर काही गुरे मधोमध रस्त्यातच उभी असलेली पाहायला मिळतात. त्यामुळे अपघाताची शक्यता असते. तर रात्रीच्या वेळी रस्त्यात बसलेली गुरे दिसूनही येत नाहीत. तरी याबाबत योग्य ती कार्यवाही हाती घेण्यासाठी मालगुंड ग्रामपंचायतीने विशेष मोहिम हाती घ्यावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गातून केली जात आहे.

