( गणपतीपुळे / वैभव पवार )
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड बौद्धवाडी येथील बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक शाखा क्रमांक 17 तथा बौद्ध ग्रामस्थ मंडळ आणि आदर्श महिला मंडळ मालगुंड यांचे संयुक्त विद्यमाने त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचा 127 वा जयंती कार्यक्रम मोठ्या उत्साहात शुक्रवारी धम्मचेतना बुद्धविहारात महिला मंडळाच्या उपाध्यक्षा शर्मिला पवार यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन मालगुंड येथील आदर्श महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी संपूर्ण कार्यक्रमाचे अत्यंत नेटके नियोजन महिला मंडळाने केल्याने हे नियोजन उपस्थितांसाठी लक्षवेधी ठरले.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी धम्मचेतना बुद्धविहारातील आदर्शांसमोर महिला मंडळाचे आणि स्थानिक शाखेचे प्रमुख पदाधिकारी यांचे हस्ते गंध व दीपप्रज्वलन करण्यात आले.तसेच माता रमाई यांच्या प्रतिमेला कार्यक्रमाच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर या कार्यक्रमात धार्मिक पूजापाठ बौद्धाचार्य वैभव पवार यांच्या नेतृत्वाखाली सामुदायिकपणे घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिला मंडळाच्या वतीने वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या अभिवादन सभेमध्ये महिला मंडळाच्या निवडक सदस्यांनी त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांनी आणि बौद्ध ग्रामस्थ मंडळाच्या प्रमुख पदाधिकारी व सदस्यांनी आपली मनोगते व्यक्त करून माता रमाईच्या त्यागी कार्याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून मालगुंड येथील बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 17 तथा बौद्ध ग्रामस्थ मंडळाचे चिटणीस आणि मालगुंड येथील बळीराम परकर विद्यालयाचे कलाशिक्षक शाम पवार यांना कलाध्यापक संघाचा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान महिला मंडळ व स्थानिक शाखेच्या वतीने कार्यक्रमाच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या विचार मंचावर महिला मंडळाच्या उपाध्यक्ष तथा कार्यक्रमाच्या अध्यक्षा शर्मिला पवार, स्थानिक शाखेचे अध्यक्ष रविकांत पवार चिटणीस श्याम पवार, सहचिटणीस मयुरेश पवार, महिला मंडळाच्या चिटणीस तथा ग्रामपंचायत सदस्या शिल्पा पवार, सहचिटणीस प्रज्ञा पवार, कोषाध्यक्ष धनश्री पवार आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला मंडळाच्या चिटणीस शिल्पा पवार यांनी तर आभारप्रदर्शन महिला मंडळाच्या सदस्या आस्था पवार यांनी केले.
हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला मंडळाच्या सर्व प्रमुख पदाधिकारी व महिला सदस्यांनी विशेष मेहनत घेतली तसेच या संपूर्ण कार्यक्रमासाठी स्थानिक शाखेचे प्रमुख पदाधिकारी व सर्व बंधू भगिनींचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले.