(रत्नागिरी/ प्रतिनिधी )
मंथन परीक्षा २०२६ मध्ये कु. ओवी विलास जाधव हिने दैदिप्यमान यश संपादन करत राज्यस्तरावर आपली ठळक ओळख निर्माण केली आहे. ओवीने केंद्रात प्रथम क्रमांक पटकावत स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध केले असून तालुक्यात द्वितीय, जिल्ह्यात सातवा आणि राज्यात बारावा क्रमांक मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
कु. ओवी विलास जाधव सध्या रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी संचलित कै. ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिर, माळनाका, ता. जि. रत्नागिरी येथे शिक्षण घेत आहे. ती इयत्ता मोठा गट ‘चमेली’मध्ये शिकत असून लहान वयातच तिने आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली आहे. अभ्यासातील सातत्य, चिकाटी आणि प्रामाणिक परिश्रम यांच्या जोरावर ओवीने हे यश मिळवले असून तिच्या या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा महत्त्वाचा ठरला आहे. अत्यंत स्पर्धात्मक वातावरणात ओवीने मिळवलेले हे स्थान केवळ तिच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण परिसरासाठी अभिमानास्पद ठरत आहे.
कु. ओवी जाधव हिच्या यशामागे तिच्या आई वडिलांची भक्कम साथ आणि प्रेरणादायी वातावरण महत्त्वाचे ठरले आहे. तिचे वडील विलास जाधव हे रत्नागिरी पोलिस दलात कार्यरत असून कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि मेहनतीचा आदर्श त्यांनी आपल्या मुलांसमोर ठेवला आहे. तर आई गृहिणी असून तिने घरातील जबाबदाऱ्या सांभाळत मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले आहे. लहानपणापासूनच मुलांनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि आयुष्यात उंच शिखरे गाठावीत, असा विचार जाधव कुटुंबाने जोपासला आहे. याच प्रेरणेतून ओवीने सातत्याने अभ्यास करत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
ओवीच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असून, स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी ती एक आदर्श ठरत आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शैक्षणिक क्षेत्रातून तसेच सामाजिक स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, मंथन परीक्षेत कु. आरंभ मिलिंद सुर्वे आणि कु. ऋता सौरभ घाणेकर यांनीही घवघवीत यश संपादन करत संस्थेचा नावलौकिक वाढवला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

