(दापोली)
दापोली आगारातील एका वाहकाच्या कथित विकृत वर्तनामुळे महिला व युवती प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित वाहकाकडून प्रवासादरम्यान महिलांशी गैरवर्तन व छेडछाडीचे प्रकार होत असल्याच्या तक्रारी पुढे आल्याने संताप व्यक्त होत होता.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत उबाठा सेनेचे दापोली तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर यांनी संबंधित वाहकाविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. सदर आंदोलन छेडण्याचा इशारा देताच प्रशासन खडबडून जागे झाले.
यानंतर रत्नागिरी विभाग नियंत्रकांनी तातडीने कारवाई करत संबंधित वाहकाला निलंबित केल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयानंतर महिला प्रवासी व स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले.
दरम्यान, सार्वजनिक वाहतुकीत महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असून अशा प्रकारांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

