(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वांद्री परिसरात सुरू असलेल्या अनाधिकृत बोअर ब्लास्टिंगमुळे वांद्री तसेच उक्षी गावातील ग्रामस्थांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. या ब्लास्टिंगमुळे घरांच्या भिंतींना तडे गेले असून, काही ठिकाणी कौले पडणे, सिमेंट प्लास्टर गळून जाणे, तसेच घरे हादरण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे ग्रामस्थ जीवन–मरणाच्या छायेत वावरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
यासंदर्भात ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना स्वाक्षरीसह निवेदन देऊन बोअर ब्लास्टिंग तातडीने थांबवावे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. निवेदनात पुढील दुष्परिणामांना प्रशासन जबाबदार असेल, असेही स्पष्ट नमूद केले आहे.
ठेकेदार कंपनीवर गंभीर आरोप
बावननदी ते आरवली सुमारे ४५ कि.मी. महामार्गाच्या कामाची जबाबदारी जे. एम. म्हात्रे कंपनीकडे आहे. मात्र, या कामात सुरक्षेचे नियम पायदळी तुडवले जात आहेत, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. याआधीही सुरक्षेच्या अभावामुळे अनेक अपघात झाले असून, काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. तरीदेखील ठेकेदार कंपनीचा मनमानी कारभार सुरूच असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
183 मीटरच्या नियमाला तिलांजली
सरकारी नियमांनुसार १८३ मीटरच्या मर्यादेतच ब्लास्टिंग करता येते, मात्र प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त अंतरावर ब्लास्टिंग सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे केवळ वांद्रीच नव्हे तर नदीपलीकडील उक्षी गावही हादऱ्याने दणाणून जात आहे. प्रत्येक वेळी भूकंपाचा भास होईल इतके जोराचे हादरे बसत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
ग्रामस्थांचा इशारा
ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, अनाधिकृत बोअर ब्लास्टिंग तातडीने थांबवले नाही, तर तीव्र आंदोलन उभारले जाईल. तसेच त्या वेळी होणाऱ्या नुकसान व हानीसाठी प्रशासनालाच जबाबदार धरले जाईल.

