( हैदराबाद )
रात्रीचे साडेबारा… हैदराबाद शहर गाढ झोपेत… रस्त्यांवर भयाण शांतता… IPS सुमती यांच्या मनात मात्र एकच प्रश्न घोंगावत होता “माझं शहर महिलांसाठी खरंच सुरक्षित आहे का?” या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मलकजगिरीच्या महिला पोलीस आयुक्तांनी एक धाडसी निर्णय घेतला. त्यांनी अधिकाऱ्यांचा गणवेश बाजूला ठेवला, आपल्या खांद्यांवरील ‘स्टार्स’ काढून बाजूला ठेवले, साधे कपडे परिधान केले आणि कोणतीही सुरक्षा न घेता मध्यरात्री हैदराबादच्या रस्त्यांवर एक सामान्य तरुणी बनून ‘गुप्त वेषात’ उतरल्या. त्यांचा उद्देश स्पष्ट होता, महिलांना रात्रीच्या वेळी नेमक्या कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं, हे प्रत्यक्ष अनुभवणं.
ते 3 तास… आणि 40 जणांकडून ऑफर्स
मध्यरात्री 12:30 ते पहाटे 3:30 या कालावधीत घडलेले अनुभव धक्कादायक होते. आयुक्त सुमती रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या तर थोडावेळ चालत होत्या. यावेळी सुमती यांना एकामागून एक तब्बल 40 हून अधिक व्यक्तींनी ऑफर्स देत काहींनी छेडछाड व त्रास देण्याचा प्रयत्न केला. काही जण मद्यधुंद अवस्थेत होते, तर काही गांजाच्या नशेत होते. अनेकांनी अश्लील टिप्पणी केल्या, काहींनी थांबवण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी जवळ येण्याचा प्रयत्नही केला. धक्कादायक बाब म्हणजे या लोकांमध्ये केवळ गुन्हेगारी प्रवृत्तीचे व्यक्तीच नव्हते, तर सुशिक्षित युवक आणि विद्यार्थ्यांचाही समावेश होता. मात्र ज्यांना ते असहाय्य तरुणी समजत होते, ती प्रत्यक्षात तेलंगणा केडरची वरिष्ठ IPS अधिकारी होती, याची त्यांना कल्पनाही नव्हती.
दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात उडाली झोप
दुसऱ्या दिवशी सकाळी संबंधित सर्वांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. समोर खाकी गणवेशात बसलेल्या त्याच महिलेची ओळख उघड होताच अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली. विशेष म्हणजे, IPS सुमती यांनी या युवकांवर गुन्हे दाखल करून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याऐवजी त्यांना समज देण्याचा मार्ग निवडला. आई आणि मोठ्या बहिणीप्रमाणे त्यांनी संबंधितांना समजावत सांगितले की, महिलांशी केलेली एक चुकीची कृती त्यांच्या मनात आयुष्यभरासाठी भीती निर्माण करू शकते.
‘फील्ड वर्क’वर विश्वास ठेवणाऱ्या अधिकारी
IPS सुमती यांची कार्यपद्धती नेहमीच वेगळी राहिली आहे. कागदोपत्री अहवालांपेक्षा प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेण्यावर त्यांचा भर असतो. यापूर्वी इंटेलिजन्स ब्युरोमध्ये महत्त्वाची जबाबदारी सांभाळलेल्या सुमती यांना गुन्हेगारी मानसिकता समजून घेण्याचा मोठा अनुभव आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न केवळ कडक कायद्यांनी सुटत नाही, तर समाजाची मानसिकता बदलणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असा त्यांचा दृष्टिकोन आहे.
महिलांसाठी धाडसाचा संदेश
कोणतीही सुरक्षा नसताना मध्यरात्री एकटीने शहरात फिरून वास्तव समजून घेणाऱ्या या महिला अधिकाऱ्यांच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे. हैदराबादमधील अनेक महिलांनी त्यांचे आभार मानत हा प्रयोग महिलांच्या सुरक्षेसाठी मोठा संदेश असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. समाजात महिलांविषयी आदर आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी अशा संवेदनशील आणि धाडसी अधिकाऱ्यांची गरज असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

