( सातारा )
सातारा जिल्ह्यातील उरमोडी धरण परिसरातून एक हृदयद्रावक अपघात समोर आला आहे. सातारा तालुक्याच्या पश्चिम भागातील कासरतळे येथे शुक्रवारी रात्री सामानाने भरलेला आयशर ट्रक तब्बल ५० फूट खोल दरीत कोसळल्याने लहान मुलासह ४ जणांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली असून संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुनर्वसनासाठी घरातील साहित्य आणि जनावरे घेऊन संबंधित कुटुंब ट्रकमधून स्थलांतर करत होते. कासरतळे परिसरात ट्रकमध्ये साहित्य भरत असताना अचानक वाहनाचा तोल गेला आणि ट्रक थेट खोल दरीत कोसळला.
या अपघातात तीन महिलांसह एका लहान मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच ट्रकमधील काही पशुधनाचाही मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे. अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने सातारा जिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताचा मोठा आवाज ऐकून स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. सातारा तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, ट्रक रस्त्याच्या कडेला उभा असताना अचानक दरीत कोसळल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. रस्त्यालगतची जमीन खचली होती का, वाहन चुकीच्या पद्धतीने उभे केले होते का किंवा अन्य तांत्रिक बिघाड झाला होता का, याचा तपास पोलीस करत आहेत.
या अपघातातून ट्रक चालक बचावला असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, एका क्षणात चार जणांचा मृत्यू झाल्याने कासरतळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

