(मुंबई)
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) जवळपास पाच महिने कार्यरत असलेल्या NASA च्या क्रू-11 मिशनचा कालावधी नियोजित वेळेआधीच संपुष्टात आला आहे. क्रूमधील एका अंतराळवीराच्या आरोग्याशी संबंधित समस्येमुळे नासाने चारही अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणण्याचा निर्णय घेतला.
अमेरिकेचे माइक फिंके आणि झेना कार्डमन, रशियाचे ओलेग प्लॅटोनोव्ह आणि जपानचे किमिया युई हे चारही अंतराळवीर स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलमधून पृथ्वीवर परतले. गुरुवारी पहाटे 3:41 वाजता (ET) कॅप्सूलने सॅन दिएगो जवळील प्रशांत महासागरात यशस्वी स्प्लॅशडाऊन केलं. भारतीय वेळेनुसार दुपारी 2:11 वाजता सर्व अंतराळवीर सुरक्षितपणे पृथ्वीवर पोहोचले.
नासाकडून संबंधित आरोग्य समस्येचा तपशील जाहीर करण्यात आलेला नाही. हा निर्णय अंतराळवीरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घेतल्याचं नासानं स्पष्ट केलं आहे. वैद्यकीय गोपनीयतेमुळे कोणत्या अंतराळवीराला समस्या उद्भवली आणि नेमकं कारण काय होतं, याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.
क्रू-11 मिशन ऑगस्टच्या सुरुवातीला ISS वर पोहोचलं होतं. त्यांचा मुक्काम मूळतः मध्य-फेब्रुवारीपर्यंत असणार होता, मात्र वैद्यकीय तपासणीची गरज भासल्यानं मिशन पाच महिन्यांतच थांबवण्यात आलं. स्टेशन सोडल्यानंतर अवघ्या अकरा तासांपेक्षा कमी वेळात स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सूल पृथ्वीवर परतली. हे स्पेसएक्सचं दुसरं रात्रीचं क्रू रिकव्हरी ऑपरेशन ठरलं आहे.
नासाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी जेम्स पोल्क यांनी सांगितलं की, हा निर्णय “जोखीम आणि निदानाशी संबंधित प्रश्नांमुळे” घेण्यात आला. ही समस्या स्पेसवॉक किंवा ISS वरील कोणत्याही तांत्रिक कामाशी संबंधित नव्हती आणि ती आपत्कालीन स्वरूपाचीही नव्हती. संबंधित अंतराळवीराची प्रकृती स्थिर असून तो सुरक्षित असल्याचं नासानं स्पष्ट केलं.
अंतराळवीर पृथ्वीवर परतल्यानंतर पूर्ण वैद्यकीय पथक तैनात करण्यात आलं होतं. नासाच्या 65 वर्षांच्या मानवी अंतराळ उड्डाण इतिहासात पहिल्यांदाच वैद्यकीय कारणास्तव संपूर्ण क्रूला ISS वरून परत बोलावण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं नमूद केलं जात आहे.

