(पुणे)
अष्टविनायक गणपती भक्तांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शासन पुरातत्व विभाग यांच्या माध्यमातून अष्टविनायक मंदिरांच्या जतन, देखभाल आणि संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले असून, श्री क्षेत्र मोरगाव, श्री क्षेत्र थेऊर आणि श्री क्षेत्र सिद्धटेक ही मंदिरे 10 मे 2026 ते 9 जून 2026 या कालावधीत भाविकांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. ही तीनही मंदिरे चिंचवड देवस्थान ट्रस्ट यांच्या अखत्यारीत येतात. मंदिरांच्या दुरुस्ती आणि संवर्धनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
पौराणिक शैलीत होणार दगडी बांधकाम
पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन महिन्यांपासून मंदिरांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. मुख्य मंदिर, गाभारा आणि सभामंडपातील दगडी बांधकामाचे जतन आणि पुनर्बांधणी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, मंदिरांचा मूळ पौराणिक आणि ऐतिहासिक स्वरूप कायम ठेवण्यासाठी पारंपरिक दगडी बांधकाम शैलीचा वापर करण्यात येणार आहे.
मंदिरे बंद ठेवण्यामागचे कारण काय?
संवर्धनाचे काम सुरू असताना भाविकांची मोठी गर्दी आणि सततचा वावर यामुळे कामात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच कामाचा कालावधी वाढू नये आणि भाविकांची भविष्यातील गैरसोय टळावी, यासाठी प्रशासनाने तात्पुरते दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय धर्मादाय आयुक्त कार्यालय पुणे विभाग यांच्या सूचनेनुसार घेण्यात आल्याची माहिती ट्रस्टकडून देण्यात आली आहे.
भाविकांसाठी महत्त्वाच्या सूचना
- मंदिरे दर्शनासाठी बंद असली तरी नित्य पूजा, अर्चा आणि धार्मिक विधी नियमित सुरू राहतील.
- या कालावधीत कोणालाही थेट दर्शनाची सुविधा उपलब्ध असणार नाही.
- मंदिर परिसरात केवळ पुजारी, संवर्धन कामातील कर्मचारी, अधिकृत अधिकारी आणि विश्वस्तांनाच प्रवेश दिला जाणार आहे.
ट्रस्टकडून सहकार्याचे आवाहन
मंदार महाराज देव यांनी सर्व गणेश भक्त, ग्रामस्थ आणि स्थानिक नागरिकांना या संवर्धन कार्याचे महत्त्व ओळखून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. काम नियोजित वेळेत पूर्ण झाल्यास 10 जून 2026 पासून ही मंदिरे पुन्हा भाविकांसाठी खुली करण्यात येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

