( मुंबई )
नेदरलँड्समधील ॲमस्टरडॅम येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘प्लास्टिक रिसायकलिंग शो (PRS) युरोप 2026’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत सिद्धेश कदम यांनी महाराष्ट्राची भूमिका प्रभावीपणे मांडली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांना या परिषदेस प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्लास्टिक रिसायकलिंग आणि सर्क्युलर इकॉनॉमी क्षेत्रात कोणती महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. ही परिषद Plastic Recyclers Europe आणि Global Polymer Group यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. जगभरातील 511 संस्था या परिषदेत सहभागी झाल्या होत्या.
QR कोड प्रणालीची जागतिक मंचावर चर्चा
‘जागतिक प्लास्टिक व्यापारासाठी ट्रेसिबिलिटीचे महत्त्व’ या विषयावर बोलताना सिद्धेश कदम यांनी भारताने जुलै 2025 पासून प्रत्येक प्लास्टिक उत्पादनासाठी QR कोड प्रणाली लागू केल्याची माहिती दिली. या प्रणालीमुळे सामान्य नागरिकांना प्लास्टिक कुठून आले आणि त्याचा पुढील वापर किंवा पुनर्वापर कसा होणार याची माहिती सहज मिळू शकते, असे त्यांनी सांगितले. तसेच अन्नपदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये रिसायकल प्लास्टिकचे प्रमाण 30 टक्क्यांवरून 40 टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या भारताच्या निर्णयाचाही उल्लेख त्यांनी केला.
महाराष्ट्राची ‘सर्क्युलर इकॉनॉमी’कडे वाटचाल
महाराष्ट्र प्लास्टिक प्रदूषणाकडे केवळ स्थानिक समस्या म्हणून पाहत नसून जागतिक जबाबदारी म्हणून पाहत असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले. “तंत्रज्ञान आणि पारदर्शकतेच्या आधारे प्लास्टिक ट्रेसिबिलिटी प्रणाली मजबूत केली जात आहे. उद्दिष्ट फक्त प्रदूषण रोखणे नसून सर्क्युलर इकॉनॉमीच्या माध्यमातून उद्योगांना नवी दिशा देणे आहे,” असे त्यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांशी संवाद
या परिषदेदरम्यान डेव्हिड एस्लावा, हर्मिस पानागिओटोपौलोस, राफेल बासिआनो, यवोन व्हॅन वीन आणि विल कॉलिन्स यांच्यासह विविध आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली. दरम्यान, परिषदेनिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय प्रदर्शनालाही कदम यांनी भेट दिली. भविष्यात मुंबईत आधुनिक प्लास्टिक रिसायकलिंग तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणीसाठी विशेष उपक्रम राबवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

